सहा जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 एप्रिल 2018

मराठवाड्यात सत्ताधारी मंत्री संभाजी निलंगेकर, पंकजा मुंडे यांचा कस लागणार आहे; तर अमरावतीत राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी आव्हान पेलले आहे. कोकणात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व भाजपचे खासदार नारायण राणे यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांमधून निवडून द्यायच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत असून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी भाजपची ताकद वाढल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. 

रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, चंद्रपूर या जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी तीन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे, दोन जागा भाजपकडे, तर एक जागा कॉंग्रेसकडे होती. बदललेल्या परिस्थितीचा विचार केला तर भाजप चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकेल. जर भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांची स्थानिक पातळीवर आघाडी झाली तर विरोधकांच्या जागा घेण्याची संधी नक्‍कीच सत्ताधाऱ्यांना मिळू शकेल.

यामध्ये रायगड - रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप उमेदवार विजयी होऊ शकतो. तसेच नाशिकमध्येही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसपेक्षा शिवेसना आणि भाजपची ताकद जास्त आहे. या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो. 

मराठवाड्यात सत्ताधारी मंत्री संभाजी निलंगेकर, पंकजा मुंडे यांचा कस लागणार आहे; तर अमरावतीत राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी आव्हान पेलले आहे. कोकणात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व भाजपचे खासदार नारायण राणे यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे.

या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समित्यांचे सभापती हे पात्र मतदार असतात. सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. 

Web Title: For six Seats Opposition and Rulling Leader clashes