साठ लाखांच्या जुन्या नोटा दक्षिण मुंबईतून जप्त 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

दक्षिण मुंबईतील एका सराफाकडे नोटबंदीनंतरही पाचशे व हजारच्या जुन्या नोटा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एजंट बनून या सराफाशी संपर्क साधला. जुन्या नोटांच्या बदल्यात 40 टक्के कमिशन घेऊन नव्या नोटा देऊ, अशी भूलथाप देत पोलिसांनी त्याला जाळ्यात ओढले.

मुंबई - नोटाबंदीनंतर काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या सराफाकडून 60 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटा गुन्हे शाखेने जप्त केल्या. या प्रकरणी काळबादेवी परिसरातील सराफी पेढीच्या मालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दक्षिण मुंबईतील एका सराफाकडे नोटबंदीनंतरही पाचशे व हजारच्या जुन्या नोटा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एजंट बनून या सराफाशी संपर्क साधला. जुन्या नोटांच्या बदल्यात 40 टक्के कमिशन घेऊन नव्या नोटा देऊ, अशी भूलथाप देत पोलिसांनी त्याला जाळ्यात ओढले. सराफाने ठरल्यानुसार त्याच्या दोघा कर्मचाऱ्यांना मुंबई सेंट्रल येथे पाठवले. त्यांच्याकडे 25 लाखांच्या जुन्या नोटा सराफाने पाठवल्या.

पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेत 25 लाखांच्या जुन्या नोटा सापडल्या. त्यानंतर पोलिस या दोघांना घेऊन नवजीवन सोसायटी येथे गेले. तेथे सराफ आणखी 45 लाखांच्या जुन्या नोटा घेऊन इमारतीखाली आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.