काही महाविद्यालयांना मराठीची ऍलर्जी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना विद्यार्थी कल्याण विभागामार्फत देण्यात येतात; मात्र निम्म्याहून अधिक महाविद्यालये सूचनांकडे दुर्लक्ष करतात. मराठीची ऍलर्जी असलेल्या या महाविद्यालयांवर विद्यापीठ ठोस कारवाई करत नाही. 

मुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना विद्यार्थी कल्याण विभागामार्फत देण्यात येतात; मात्र निम्म्याहून अधिक महाविद्यालये सूचनांकडे दुर्लक्ष करतात. मराठीची ऍलर्जी असलेल्या या महाविद्यालयांवर विद्यापीठ ठोस कारवाई करत नाही. 

वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्यातील महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागामार्फत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 750 महाविद्यालयांना मराठी भाषा दिन साजरा करण्याबाबतच्या सूचना देण्यात येतात. या दिवशी महाविद्यालयांनी विविध कार्यक्रम राबवून त्याचा अहवाल विद्यापीठाकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात येतात; मात्र निम्म्याहून अधिक महाविद्यालये मराठी भाषा दिन साजरा करत नसल्याचे विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी सुमारे 65 टक्के महाविद्यालयांनी हा कार्यक्रम साजरा केला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. ही महाविद्यालये विद्यापीठाने पाठवलेल्या पत्रांना गांभीर्याने घेत नाहीत. तसेच असे कार्यक्रम साजरे न केल्यास काय कारवाई करायची ते करा, असा पवित्रा काही महाविद्यालये घेतात; मात्र त्यांच्यावर कोणत्या नियमानुसार कारवाई करावी, असा पेच निर्माण होतो, अशी अगतिकता या अधिकाऱ्याने व्यक्त केली. 

अहवालानंतर निर्णय 
मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यांनी राबवलेल्या उपक्रमांचा अहवाल सोमवारनंतर येईल. त्यानंतरच किती महाविद्यालयांनी हा दिवस साजरा केला, हे स्पष्ट होईल, असे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी सांगितले. 

अनेक महाविद्यालये मराठी भाषा दिन साजरा करत नाहीत. त्यांना हा दिवस साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 
- डॉ. एम. ए. खान, कुलसचिव 

Web Title: Some colleges allergy Marathi