पत्नीच्या हट्टामुळे प्राध्यापक ते कलेक्‍टरपर्यंत झेप! 

पत्नीच्या हट्टामुळे प्राध्यापक ते कलेक्‍टरपर्यंत झेप! 

उल्हासनगर - प्राध्यापकी जीवन जगत असतानाच पत्नीने एमपीएससीची परीक्षा देण्याचा आणि अधिकारी म्हणून वावरण्याचा हट्ट कायम ठेवला. शेवटी तिच्या हट्टापायी मीही पेटून उठलो. प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच एमपीएससीची परीक्षा दिली आणि तहसीलदार ते कलेक्‍टर अर्थात जिल्हाधिकारी अशी झेप घेता आली... महिला दिनानिमित्त उल्हासनगरातील कमलेश आणि अजिता सोनाले दांपत्याची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी ठरते. 

1977 मध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर गावात असलेल्या एसपीडीएम महाविद्यालयात कमलेश सोनाले अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच महाविद्यालयात अजिता शिकायच्या. एका स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान दोघांची मने जुळली आणि दोन्ही घरच्यांच्या संमतीने 1978 मध्ये विवाहाच्या बोहल्यावर चढले. विवाहानंतरही कमलेश यांनी अजिता यांचे शिक्षण थांबवले नाही. अजिता यांनीही एम. ए.-बी. एड. पूर्ण करून शिक्षिकेची नोकरी सुरू केली. 

कमलेश यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना अजिता यांना होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मर्यादित न राहता, गोरगरिबांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी अधिकारी व्हावे आणि त्यासाठी यूपीएससी-एमपीएससी परीक्षा द्याव्यात, असा हट्ट त्यांनी धरला. इतक्‍यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी त्याचा पाठपुरावा कायम ठेवला. शक्‍य होणार नाही; पण प्रयत्न करणार, असे आश्‍वासन अजिता यांना देत कमलेश यांनी गुपचूप अभ्यास सुरू केला आणि 1986 मध्ये एमपीएससी परीक्षा पास होऊन पत्नीला सुखावून सोडणारी गिफ्ट दिली... प्राध्यापकी सोडली आणि तहसीलदार म्हणून कोकणातील रत्नागिरीला पदभार स्वीकारला. शिक्षिका असलेल्या अजिता यांना पतीच्या विविध ठिकाणी होणाऱ्या बदल्यांमुळे तब्बल सहा वेळा नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. सोनाले दांपत्यांना शिल्पा, अश्‍लेशा आणि पूर्वल अशी तीन मुले. ती मोठी होऊ लागल्यानंतर सोनाले दांपत्याने उल्हासनगरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इथे येताच अजिता यांना तक्षशिला विद्यालयात नोकरी लागली. त्या 2019 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. 

कमलेश सोनाले यांना अखेरची पोस्टिंग प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात मिळाली. त्यांनी 2010 ते 2012 अशी दोन वर्षे गोंदियात पदभार सांभाळला. तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. सोनाले दांपत्याची मोठी कन्या शिल्पा भंडारा जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी आहे. 

माझ्या हट्टाचे चीज झाले 
माझ्या हट्टाचे चीज माझ्या पतीने करून दाखवले. त्यांनी लोकोपयोगी योजना मार्गी लावल्या. वंचित असलेल्या गोरगरिबांना न्याय दिला. ते प्राध्यापकच राहिले असते, तर प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले असते. त्यापेक्षा त्यांची जिल्हाधिकारी म्हणून झालेली सेवानिवृत्ती सुखावणारी आहे, अशी प्रतिक्रिया अजिता सोनाले यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com