ध्वनिवर्धकांबाबतच्या नियमांचे पालन केले जाईल - सरकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

मुंबई - प्रार्थनास्थळांवर लावलेल्या ध्वनिवर्धकांबाबतही नियमांचे पालन केले जाईल व कायदेभंग झाला तर दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. या विषयावर संतोष पाचलग, महेश बेडेकर आदींनी सादर केलेल्या जनहित याचिकांवरील अंतिम सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सैयद यांच्यासमोर सुरू आहे. त्या वेळी सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी वरील माहिती दिली.

मुख्यतः मशिदींवर विनापरवाना लावलेल्या ध्वनिवर्धकांविरुद्ध ही याचिका आहे. या ध्वनिवर्धकांवरून पहाटे साडेचार वाजताही मोठ्या आवाजात प्रार्थना केली जाते, असा आरोप याचिकेत केला आहे. प्रार्थनास्थळांवरील ध्वनिवर्धकांसंदर्भात ध्वनिप्रदूषण नियमाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सरकारच्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

बंद खोलीत ध्वनिवर्धक...
सायलेन्स झोनमध्ये बंद सभागृहात ध्वनिवर्धक लावता येईल, त्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे आहे; मात्र त्यातील आवाज सायलेन्स झोनच्या मर्यादेतच असला पाहिजे, असेही सरकारने म्हटले आहे. सायलेन्स झोनमध्ये बंद सभागृहात ध्वनिवर्धक लावण्यास संमती नाकारता येणार नाही. असे केले तर सायलेन्स झोनमध्ये कोठेही चित्रपटगृहे, नाट्यगृहे चालणारच नाहीत किंवा सायलेन्स झोनमधील घरातही वाद्ये किंवा म्युझिक सिस्टिम वापरता येणार नाही. कायद्याचा असा अर्थ काढणे हे धोकादायक ठरेल व ते जनहिताचेही ठरणार नाही, असा सरकारचा दावा आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी (ता. 22) होणार आहे.