एसटी महामंडळाच्या 'शिवशाही'ला मिळेना मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - एसटी महामंडळाने आरामदायी प्रवासासाठी पाहिलेले "शिवशाही' बसचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार नाही. महामंडळाने पुन्हा निविदा मागवत एक हजार वातानुकूलित बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने माघार घेतल्याने महामंडळाने पहिली निविदा प्रक्रिया रद्द करत आता पुन्हा नव्या कंपन्यांना आवतण दिले आहे.

वायफाय, सीसी टीव्ही व स्लीपर कोच आदी सुविधा असलेल्या "शिवशाही' बसचे पहिले दर्शन जानेवारी 2016 मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घडवले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या सोहळ्यात "शिवशाही' बसची घोषणा करण्यात आली होती. त्या वेळी 500 बस लवकरच ताफ्यात सामील होतील, असे जाहीर करण्यात आले होते. या बस महामंडळ भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यात कंपनीचा चालक आणि महामंडळाचा वाहक असेल. मात्र वर्षभरात "शिवशाही' बस ताफ्यात येण्याची तारीख कधीच जुळून आली नाही. पहिल्या निविदा प्रक्रियेत "रेनबो' कंपनीने ती जिंकल्यानंतर 22 जानेवारीला महामंडळाने वर्कऑर्डर दिली होती. शिवशाही बसचे डिझाइन व भाडेही राज्य परिवहन प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वीच निश्‍चित केले. "शिवशाही' ताफ्यात येण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असतानाच अचानक "रेनबो' कंपनीने माघार घेतली आहे. यामुळे महामंडळाने मंगळवारी (ता.13) नव्याने एक हजार वातानुकूलित बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रकिया सुरू केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बस पुरविण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीने ऐनवेळी माघार घेतली आहे. निविदेत नमूद केलेल्या रकमेत वातानुकूलित बस पुरवणे महामंडळाला परवडणार नाही, अशी भूमिका कंपनीने घेतल्याने नव्याने निविदा मागविण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आहे. आता "शिवशाही' बसचे डिझाइन निश्‍चित असले, तरी नव्या कंपनीची नियुक्‍ती व बसच्या पाहणीत बरेच महिने जातील.