'स्टेंट'साठी जादा पैसे घेणाऱ्यांवर कारवाई - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक स्टेंट, कॅथेटर व बलून्स यांसारख्या वैद्यकीय सामग्रीसाठी रुग्णांकडून उत्पादन किमतीपेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या मुंबईतील आठ मोठ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत दिली. यापूर्वी झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये रुग्णालयांकडून किती पैसे आकारण्यात आले, याची माहितीही रुग्णांशी संपर्क साधून घेतली जात आहे, असेही ते म्हणाले.

कॉंग्रेसचे संजय दत्त यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. जादा पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर ग्राहक संरक्षण वैध कायद्यामार्फत कारवाई करून गुन्हा दाखल झाला आहे. यात दोषी आढळणाऱ्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. या कायद्याची योग्य व कठोर अंमलबाजावणी व्हावी यासाठी सामाजिक संस्था, निवृत्त अधिकारी व कंत्राटी तत्त्वावर व्यक्तींची नेमणूक केली जाईल, अशी माहिती बापट यांनी दिली. मुंबईतील फोर्टीस, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, कोकिलाबेन हॉस्पिटल, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, ग्लोबल हॉस्पिटल, पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल, सर एच. एन. हॉस्पिटल (रिलायन्स फाऊंडेशन) या आठ मोठ्या रुग्णालयांवर छापे टाकण्यात आले होते. उपचारानंतर घरी गेलेल्या रुग्णांच्या फायली तपासण्यात आल्या. त्यात स्टेंटची मूळ किंमत आणि रुग्णालयाने आकारलेली किंमत यातील तफावत काढली. ती रुग्णालयाकडून वसूल करण्यात आल्याचेही बापट म्हणाले.

Web Title: staint the additional money for the buyer to take action