राज्य निवडणूक आयोगाचे 'ट्रू व्होटर ऍप'

प्रशांत बारसिंग
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

निवडणूक निकालाची मतदारांना मिळणार मोबाईलवर माहिती
मुंबई - राज्यातील स्थानिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने "ट्रू मतदार ऍप' विकसित केले असून, त्यावरून मतदारांना निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

मतदानासंदर्भातील माहितीसोबतच उमेदवारांचा तपशील आणि निवडणुकीचा निकालही ऍपवर उपलब्ध होणार असून अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करणारे महाराष्ट्र देशात एकमेव राज्य असेल, अशी माहिती आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अनेक विविध तंत्रांचा वापर सुरू केला आहे. सध्या राज्यातील दोनशेपेक्षा अधिक नगरपालिका, नगरपंचायतींसाठी येत्या 27 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर राज्यातील 26 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत पंचायत समित्या आणि मुंबई-ठाण्यासह दहा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर उमेदवारांना दैनंदिन खर्चही ऑनलाइन भरता येणार आहे.

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या, तसेच उमेदवारांवर पक्षाकडून करण्यात येणाऱ्या खर्चाचा तपशीलही ऑनलाइन भरण्याचे आदेश आयोगाने काढले आहेत. आता सर्वसामान्य मतदारांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी "ट्रू व्होटर' नावाचे मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपवर मतदारांना मतदार यादी, त्यातील स्वतःचे नाव, अनुक्रमांक, मतदान केंद्र याबाबतचही इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा त्यांच्या खर्चासह तपशीलही पाहता येईल. याच ऍपवर निवडणुकीच्या निकालाचे अपडेटही उपलब्ध करून देण्याचा आयोगाकडून प्रयत्न सुरू आहे. हे ऍप कार्यान्वित झाल्यास मतदारांना निवडणुकीच्या संदर्भातील सर्व माहिती या ऍपवर उपलब्ध होईल, अशी माहिती आयोगातून देण्यात आली.

'ट्रू व्होटर' ऍपवर काय पाहता येईल?
- मतदार यादी
- मतदान केंद्राचे ठिकाण
- उमेदवारांचा तपशील
- आपत्कालीन यंत्रणा
- मतदानासंदर्भातील कायदे व नियम
- मतदान खर्च आणि त्याची मर्यादा
- स्वतःचे मत आणि तक्रार दाखल करता येणार
- निवडणुकीचा निकाल

Web Title: State Election Commission 'True Voter App'