डोळासणेच्या खडी क्रशिंगची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - नगर जिल्ह्यातील डोळासणे येथील यमोंटो कार्लोफ कंपनीच्या डांबर व खडी क्रशिंग प्रकल्पामुळे विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीतील तेल गळतीमुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. हे प्रकरण चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना हस्तांतरित केले आहे, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पोटे- पाटील बोलत होते.

या प्रकरणाची संगमनेरच्या पंचायत समिती अधिकारी, प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाण्याची तपासणी केली. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अहवालानुसार हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल सादर केला आहे. तसेच पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी सुद्धा पाण्याची पूर्वतपासणी करून पाणी पिण्यायोग्य असल्याबाबत अहवाल दिला आहे, सद्य:स्थितीत हा प्रकल्प बंद आहे, असेही पोटे-पाटील यांनी सांगितले.

Web Title: stone crushing inquiry by collector