बारावी पेपर फुटीप्रकरणी तीन विद्यार्थी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - बारावीचा वाणिज्य शाखेचा बुक किपिंग ऍन्ड अकाऊटन्सी (बी.के) चा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. परीक्षा नियंत्रकांनी याची माहिती कांदिवली पोलिसांना दिली. फुटलेला पेपर व्हॉट्‌सऍपवर पसरला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना चौकशीकरता ताब्यात घेतले. चौकशी करून पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.

यंदा बारावी पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याच्या घटना घडल्यात. सलग तीन पेपर फुटल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली होती. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा शुक्रवारी (ता.10) बुक किपिंग ऍन्ड अकाऊटन्सी विषयाचा पेपर होता. कांदिवली पश्‍चिम येथील दोन शाळांमध्ये तीन विद्यार्थी उशिरा आले. हा प्रकार बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्या तिन्ही विद्यार्थ्यांची प्राथमिक चौकशी केली. त्या तिघांच्या मोबाईलवर बी. के. चा पेपर आढळून आल्याने अधिकारी चक्रावले. तो पेपर व्हॉटसअप ग्रुपवरून मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

या गंभीर प्रकाराची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कांदिवली पोलिसांना कळवली. पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. पेपर आपल्याला व्हॉटसऍप ग्रुपवरून आल्याचे विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले. ते तिन्ही विद्यार्थी कांदिवलीच्या दोन खासगी महाविद्यालयाचे आहेत. रात्री उशिरा पेपर फुटीप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्यांची चौकशी करून पुढील कारवाई कांदिवली पोलिस करणार आहेत.