सूतिकागृहाला मिळणार नवसंजीवनी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

डोंबिवली - एकीकडे कल्याण-डोंबिवली शहरात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतानाच डोंबिवली शहरातील सूतिकागृहही पाच वर्षांपासून बंद आहे. याप्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच केडीएमसीच्या अधिकारी वर्गाला धारेवर धरत आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली. पालिकेच्या संबंधित विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शिंदे यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत बैठकही घेतली. दरम्यान, नुकत्याच सादर झालेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पात सूतिकागृहाच्या बांधणीसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे ‘सुतकी’ अवस्था प्राप्त झालेल्या सूतिकागृहाला नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

सूतिकागृहाचा पुनर्विकास करण्याची महापालिकेची क्षमता नसल्याने पीपीपी तत्वावर सूतिकागृहाचा पुनर्विकास होऊन सरकारी दराने रुग्णसेवा देण्यात यावी, यासाठी गेली तीन वर्ष पाठपुरावा करूनही कोणतीही पावले उचलली जात नसल्याबाबद्दल खासदार शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची स्वतः पाहणी करून विविध सेवांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त बोडके यांनी स्पष्ट केले. याआधीही खासदार शिंदे यांनी विविध समस्येसंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे; मात्र पालिकेत शिवसेनेचे पारडे जड असूनही अधिकारी वर्गाची वारंवार झडती घ्यावी लागत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ‘सकाळ’नेही सूतिकागृहाच्या समस्येबाबत बातमी प्रसिद्ध करून याबाबतचे महत्व अधोरेखित केले होते. 

निधीची अडचण संपली
‘आपली महापालिका स्मार्ट महापालिका’ असे म्हणत पालिकेच्या अर्थसंकल्पात सुतिकागृह गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे, ही बाब लाजिरवाणी आहे असे म्हटले आहे. तसेच यासाठी स्थायी समितीने अडीच कोटी रुपयांची तरतूद केली असून आणखी अडीच कोटी रुपये पालिकेला अनुदान स्वरूपात मिळाले आहेत. त्यामुळे सूतिकागृहाला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी निधीची अडचण राहिली नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भवष्यात याबाबत काही हालचाल होते की, पुन्हा निविदा प्रक्रियेमध्ये हे काम रखडले जाते याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: sutikagrah of Dombivli city