तोंडी तलाकला विरोध करणाऱ्या महिलेचे घूमजाव

सुनीता महामुणकर
रविवार, 21 मे 2017

पतीवरील फौजदारी गुन्हे मागे घेण्याची मागणी
मुंबई - न्यायालयात याचिका दाखल करून तोंडी तलाकला विरोध करणाऱ्या महिलेने नुकतेच अचानक घूमजाव करत पतीवरील सर्व फौजदारी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करत याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने रजिस्ट्रारना दिले आहेत.

पतीवरील फौजदारी गुन्हे मागे घेण्याची मागणी
मुंबई - न्यायालयात याचिका दाखल करून तोंडी तलाकला विरोध करणाऱ्या महिलेने नुकतेच अचानक घूमजाव करत पतीवरील सर्व फौजदारी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करत याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने रजिस्ट्रारना दिले आहेत.

अंधेरीत राहणाऱ्या या महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात भा. दं. वि. 498 नुसार फौजदारी फिर्याद केली आहे. सासरच्या मंडळींनी दोन लाख रुपये हुंडा आणि गाडीची मागणी केली होती. ती पूर्ण न केल्यामुळे त्यांनी माझा छळ केला. पतीने तोंडी तलाक देऊन जबरदस्तीने घराबाहेर काढले, असे तिने या तक्रारीत नमूद केले होते.

मुस्लिम परंपरा आणि रूढींची माहिती माझा पती आणि सासरच्या लोकांना चांगल्या प्रकारे आहे. ते या रूढी-परंपरांचा गैरवापर करत आहेत. त्यांनी दिलेला तोंडी तलाक मुस्लिम धर्माविरोधात असून, तो मला मान्य नाही. त्यांच्यावर कारवाई न केल्यास ते यापुढे अन्य महिलांचे जीवनही हलाखीचे करतील, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

या महिलेने नुकतीच पतीसह सासरच्या मंडळींविरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे. न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने या घूमजावबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. याचिकादार महिलेला प्रतिज्ञापत्रामध्ये इंग्रजीत काय लिहिले आहे, याची माहिती आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केली.

त्यावर शिक्षण हिंदी माध्यमातून झाल्यामुळे इंग्रजी फार कळत नाही, थोडी माहिती आहे, असे उत्तर तिने दिले. त्यामुळे या प्रतिज्ञापत्रातील तपशील तिला योग्य प्रकारे समजणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयीन रजिस्ट्रारना दिले. संबंधित महिलेशी बोलून याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: talak oppose women confuse