झळा या लागल्या जीवा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

मुंबईत पारा 38.4 अंशावर; आणखी काही दिवस होरपळ
मुंबई - तापमानाने सोमवारी नवा उच्चांक गाठला. पारा थेट 38.4 अंशावर पोहचल्याने मुंबईत हा सर्वांत तप्त दिवस ठरला. तीन वर्षांतील तापमानाच्या उच्चांकात हा दुसरा क्रमांक आहे. काही दिवस पारा चढलेलाच राहील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे.

रविवारी 35 अंशावर असलेला पारा सोमवारी तीन अंशांपेक्षाही पुढे सरकला. सरासरीपेक्षा ही वाढ तब्बल पाच अंशांनी जास्त नोंदवली गेली.
जमिनीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव या दिवसांत जास्त असल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे. आणखी काही दिवस कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्‍यता आहे.

2015 मध्ये 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्याखालोखाल सोमवारी पारा चढला होता. 10 वर्षांतील तापमानाच्या उच्चांकात 2011 मध्ये 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे.
1956 मध्ये मार्चमधील सर्वाधिक तापमान 41.3 अंश सेल्सिअस होते. 50 वर्षांतील हे सर्वांत जास्त तापमान होते. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार- ही तापमानवाढ आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे.

आठवड्याच्या शेवटी तापमान सरासरीच्या जवळपास येईल. मात्र, सोमवारी झालेली तापमानवाढ यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत दोन वेळा दिसून आली. 18 फेब्रुवारीला तापमान 38 अंशाजवळ गेले होते. त्यानंतर सोमवारी तापमान 38.4 अंशावर गेले. उर्वरित राज्यातही तापमानात वाढ झाली असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.