"व्हेंटिलेटर' असलेली युती "कासव'गतीने सुखरूपतेकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई - "व्हेंटिलेटर'वर असलेली शिवसेना- भाजपची युती "कासव'गतीने सुखरूपतेकडे जात आहे, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. 

मुंबई - "व्हेंटिलेटर'वर असलेली शिवसेना- भाजपची युती "कासव'गतीने सुखरूपतेकडे जात आहे, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. 

दिल्ली येथील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सहभोजनानंतर शिवसेना-भाजप युतीतील वाद निवळला असल्याचे संकेत उद्धव यांनी दिल्याचे मानले जात आहे. दिल्ली भेटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे आज मुंबईत पत्रकारांसमोर आले. सुवर्णकमळ पुरस्कार मिळालेल्या "कासव'सह राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त "व्हेंटिलेटर', "दशक्रिया' आणि "सायकल' या चित्रपटांच्या टिमने "मातोश्री' येथे उद्धव यांची भेट घेतली. त्या वेळी पत्रकारांनी "व्हेंटिलेटर'वर असलेली युती सुखरूप आहे का, असा प्रश्‍न विचारला. "युती कासवगतीने सुखरूपतेकडे चालली आहे,' असा मार्मिक टोला उद्धव यांनी लगावला. आज मी फक्त "सुवर्णकमळ'वर बोलणार, असे सांगत उद्धव यांनी राजकीय प्रश्‍नांना उत्तर देण्यास टाळले. 

पाकिस्तानचा निकाल लावा 

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात सुनावण्यात आलेल्या फाशीवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला. चर्चा करण्यापेक्षा पाकिस्तानचा निकालच लावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. मी दिल्लीत असताना केंद्र सरकारची या विषयावर चर्चा सुरू होती. देशात सह्यांची मोहीमही सुरू आहे; मात्र असे करून पाकिस्तान ऐकणार नाही. आपल्या माणसांना दहशतवादी ठरवून फासावर लटकवले जात असेल, तर पाकिस्तानचा निकाल लावावा लागेल. जवान चंदू चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढा आता लागायला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने पाकिस्तानला विरोध केल्यास टीका केली जाते; पण अशी घटना घडली की सर्वांचे राष्ट्रप्रेम जागे होते. या भावना कायम जाग्या राहिल्या तर पाकिस्तानला धडा मिळेल, असेही उद्धव म्हणाले. 

Web Title: Thackeray's appreciative comments