घोडबंदर रोडवरील नव्या बांधकामांना फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

ठाणे - नोटाबंदीनंतर अडचणीत आलेल्या घोडबंदर रोडवर प्रकल्प सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या बांधकामांना ताबा प्रमाणपत्र (ओसी) बंदी असल्याने जोरदार फटका बसला आहे. या भागातील भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन न्यायालयाने नव्या "ओसी' देण्यास मनाई केल्याबाबत अद्याप तोडगा न निघाल्यामुळे 285 इमारतींना महापालिकेकडून "ओसी' नाकारण्यात आली आहे. त्यामुळे इमारती तयार होऊनही त्यांच्या विक्रीबाबत या बांधकाम व्यावसायिकांना न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

उच्च न्यायालयाने घोडबंदर रोडवरील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे आदेश दिल्यानंतर पुन्हा पाच वर्षांत या भागात किती बांधकामांना "ओसी' देण्यात आली आहे; तसेच किती बांधकामांना पाणीजोडणी दिली, याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने पाच वर्षांत 209 प्रकल्पांना "ओसी' दिली असून, त्यातील 206 प्रकल्पांना एक हजार 478 पाण्याचे कनेक्‍शन दिल्याची माहिती दिली आहे.