मोपलवारांकडे खंडणी मागणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

ठाणे - भ्रष्टाचाराच्या तक्रारी मागे घेण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांच्याकडे दहा कोटींची खंडणी मागणाऱ्या सतीश मांगले आणि श्रद्धा मांगले या दांपत्याला एक कोटी घेताना ठाणे पोलिसांनी गुरुवारी (ता.2) अटक केली.

डोंबिवलीच्या पलावा सीटी गृहसंकुलात राहणारे मांगले दाम्पत्य मोपलवार यांना ब्लॅकमेल करीत होते. मोपलवार यांनी प्रथम खंडणी देण्यास नकार दिला; परंतु 31 ऑक्‍टोबरला मांगले दांपत्याचा फोन आल्यावर तडजोडीनुसार सात कोटी खंडणी म्हणून देण्याची तयारी दर्शवली. मोबाईलवरील हे संभाषण मोपलवार यांनी ध्वनिमुद्रित केले. ते ठाणे पोलिसांना ऐकवल्यावर पोलिसांनी एका पोलिसाला एक कोटीची रक्कम घेऊन मांगले यांच्या घरी पाठवले. या सापळ्यात मांगले दाम्पत्य अडकले. त्यांचे दोन साथीदार मात्र फरारी आहेत, अशी माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी शुक्रवारी (ता. 3) पत्रकार परिषदेत दिली.

सनदी अधिकारी असलेले मोपलवार यांच्यावर सतीश याने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याबाबतची एक ध्वनिफीतही त्याने प्रसिद्ध केली होती.

राधेश्‍याम मोपलवार आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाल्यानंतर मोपलवार यांनी प्रायव्हेट डिटेक्‍टिव्ह असलेल्या सतीश मांगलेची मदत घेतली होती. तेव्हापासून तो मोपलवार यांच्या संपर्कात होता. तेव्हापासून मोपलवार यांचे फोनवरील संभाषण ध्वनिमुद्रित करण्याची सवय त्याला लागली होती. या ध्वनिमुद्रित संभाषणांमध्ये त्याने काही तांत्रिक बदल केले आणि या ध्वनिफिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोचवल्या होत्या.