मध्य रेल्वेच्या दिरंगाईचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

ठाणे - मध्य रेल्वेच्या दिरंगाईचा फटका प्रवाशांना अद्यापही सहन करावा लागत आहे. त्यातच गुरुवारी (ता. १४) दुपारी साधारण दोन तास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकलच नसल्याने जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ झाली. परिणामी कल्याण, डोंबिवली, ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. 

कल्याणहून मुंबईला जाणारी धीमी लोकल अचानक बंद झाली होती. धीम्या मार्गावरून जलद लोकल धावत असल्याचे अनेक प्रवाशांच्या लक्षात आले नाही. डोंबिवली स्थानक गेल्यानंतर ‘पुढील स्टेशन ठाणे’ अशी गाडीत घोषणा होताच गाडी जलद असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. यामुळे मुंब्रा, दिवा येथे उतरणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. ठाणे स्थानकातही फलाट क्रमांक ६ ऐवजी जलद गाडी फलाट क्रमांक ४ वर आल्याने ती पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागली. दिवा, मुंब्रा, कळवा येथे उतरणाऱ्या प्रवाशांना ठाण्यात आल्यानंतर कल्याणच्या दिशेने जाणारी धीमी लोकल पकडून प्रवास करावा लागला.

याविषयी रेल्वे प्रशासनाकडे मात्र कोणतीच माहिती नसल्याचे दिसून आले. रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर चौकशी करून सांगतो, असे उत्तर मिळत होते. परंतु प्रवाशांचे समाधान होईल, असे उत्तर विभागाकडून देण्यात आले नाही. कोणतीही घोषणा स्थानकांवर करण्यात येत नव्हती.

लोकल उशिराने धावत असून याव्यतिरिक्त कोणताही परिणाम रेल्वे सेवेवर झाला नाही. लोकल व्यवस्थित सुरू आहेत.
- ए. के. सिंग,  जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

मुंब्रयाला जायचे असल्याने डोंबिवली स्थानकात फलाट तीनवरून गाडी पकडली. परंतु नंतर गाडी जलद असल्याची घोषणा करण्यात आली. ठाणे स्थानकात उतरून माघारी येण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु तेथे तिकीट तपासनीसाने पकडले असते, तर आम्हाला फुकट दंड भरावा लागला असता.
- संजना सोनटक्के, प्रवासी.