विसर्जन घाटांवर जीवरक्षक सेवा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

ठाणे - गणेश विसर्जन घाट, चौपाट्या व कृत्रिम तलावाच्या परिसरात विसर्जन काळात अपघात घडू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने पुढाकार घेतला आहे. 

ठाणे - गणेश विसर्जन घाट, चौपाट्या व कृत्रिम तलावाच्या परिसरात विसर्जन काळात अपघात घडू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने पुढाकार घेतला आहे. 

शहरातील ५२ विसर्जन घाटांच्या ठिकाणी जीवरक्षक तैनात केले जाणार असून, त्यांच्या माध्यमातून अपघातांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वर्षातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व छटपूजेसारख्या खाडी किंवा तलावामध्ये केल्या जाणाऱ्या उत्सवांच्या काळात हे जीवरक्षक या काठांवर भाविकांना सुरक्षेची सेवा देणार आहेत. यापूर्वी हे काम अग्निशमन दलाकडून होत असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा मोठा ताण येत होता. अग्निशमन केंद्र बंद ठेवून ही कामे करावी लागत होती; परंतु या योजनेतून अतिरिक्त मनुष्यबळ मिळणार असल्यामुळे अग्निशमन दलाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.     

चौपाट्या आणि विसर्जन घाटांवर अतिउत्साही भाविकांमुळे अपघाताची परिस्थिती निर्माण होत असून, सदैव सतर्क राहण्याची वेळ अग्निशमन यंत्रणेवर येत होती. सध्याच्या वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष ठेवणे अग्निशमन यंत्रणांना शक्‍य होत नव्हते. या कामासाठी खासगी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शहरातील ५२ विसर्जन घाटांच्या ठिकाणी प्रत्येक दोन जीवरक्षक नियुक्त करण्याचा विभागाचा मानस आहे. ही मंडळी पोहण्यात निष्णात असतील. यापूर्वी अग्निशमन यंत्रणांच्या माध्यमातून ही कामे होत होती; परंतु त्याला मर्यादा येत होत्या. जीवरक्षकांची नियुक्ती झाल्यास विसर्जन घाट पोहण्यासाठी सुरक्षित होऊ शकतील, असा विश्‍वास अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा पहिल्यांदाच सेवा
कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन घाटावरील गर्दीमध्ये अपघाताची परिस्थिती उद्‌भवल्यास त्यांच्या मदतीसाठी अग्निशमन यंत्रणांना डोळ्यांत तेल घालून सेवा द्यावी लागत होती. कामे बंद ठेवून पूर्ण वेळ या भागात सतर्क होऊन उभे राहावे लागत होते. ताण सहन करावा लागत होता. त्यावर मात करण्यासाठी अग्निशमन विभागाने विसर्जन घाटांवर जीवरक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ९ ते १५ ऑगस्टदरम्यान या संदर्भातील अनुभवी व्यावसायिक संस्थेला या उपक्रमासाठी निविदा भरता येईल. त्यानंतर १६ ऑगस्टला या संदर्भातील निविदा उघडून योग्य संस्थेची निवड केली जाईल. यंदा कल्याण-डोंबिवलीच्या विसर्जन घाटावर जीवरक्षकांची व्यवस्था होऊ शकेल, अशी माहिती अग्निशमन विभागाचे उप अग्निशमन अधिकारी सुधाकर कुलकर्णी यांनी दिली.