दुकानाचे शटर उचकटून७१ मोबाईल चोरीला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

ठाणे - ठाण्यातील तलावपाळी परिसरातील मालतीबाई हॉस्पिटलसमोरील मोबाईल शॉपचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून १० लाख रुपये किमतीचे ७१ मोबाईल पळवले. याप्रकरणी दुकानाचे मालक भरत जैन (वय ४२) यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

ठाण्यातील तलावपाळी परिसरात मालतीबाई हॉस्पिटल असून त्याच्या समोर भरत जैन यांच्या मालकीचे मोबाईल शॉप आहे. शनिवारी रात्री जैन दुकान बंद करून घराकडे परतले. सकाळी जैन यांच्या शेजारच्या दुकानदाराने त्यांना फोनवरून दुकानाचे लॉक तुटले असल्याचे सांगितले. जैन यांनी दुकानात येऊन कपाट तपासल्यानंतर विविध कंपन्यांचे मोबाईल, आय फोन आणि अन्य साहित्य असा १० लाख १७ हजारांचा ऐवज पळवल्याचे उघड झाले. 

चोरीला गेलेल्या मोबाईलची संख्या ७१ आहे. पोलिसांनी दुकानातील सीसी टीव्ही फुटेज तपासले असून रेनकोट घातलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी दुकानाचे शटर उचकटून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांनी पिशवीमध्ये मोबाईल भरून तेथून पोबारा केला. सध्या सीसी टीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिस शोध करीत आहेत.