पेट्रोल चोरी प्रकरणानंतर पेट्रोलियम कंपन्यांना आली जाग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

ठाणे - पेट्रोलियम कंपन्यांच्या ग्राहक तक्रार निवारण हेल्पलाईनवर फोन केल्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्या कंपन्या पेट्रोल चोरी प्रकरणानंतर जागरूक झाल्या आहेत. ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्याची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यासही पुढे येऊ लागल्या आहेत. यापूर्वी ज्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, अशा नागरिकांनाही संपर्क करून त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा या कंपन्यांनी प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. 

ठाणे पोलिसांनी पेट्रोल पंपाच्या मीटरमधील हेराफेरी उघड करून पेट्रोल चोरीचे रॅकेट उद्‌ध्वस्त केले. पोलिसांकडून पेट्रोल पंपावर कारवाई सुरू असताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. पेट्रोल पंपमालकांकडून सुरू असलेली लूट आणि त्याविषयीच्या तक्रारी करूनही कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ही कारवाई अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे; तर यापूर्वी नागरिकांनी कमी पेट्रोल किंवा डिझेल मिळत असल्याची तक्रार केली असता त्यांच्याकडे पाठ फिरवणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांचे हेल्पलाईनवरून अनेक तक्रारदार नागरिकांना पुन्हा फोन येऊ लागले असून त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडूनही पोलिसांना ग्राहक तक्रारींची माहिती उपलब्ध केली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

पाच शहरांमध्ये पोलिस पथके रवाना... 
खांदेश आणि मराठवाड्यामध्ये ठाणे पोलिसांची पथके रवाना झाली असून, इतरही काही शहरांमध्ये पोलिसांच्या कारवाया जोरात सुरू आहेत. नवी मुंबई, रायगड, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर भागामध्ये पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आतापर्यंत 13 पेट्रोल पंपांविरोधात कारवाई झाली असून तेथून अनेक आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने देण्यात आली.