सुरक्षारक्षकांच्या संपामुळे ठाण्यातील वास्तू सुरक्षेविना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

ठाणे - महापालिकांच्या वास्तूंच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाला आगाऊ तीन महिन्यांची सुरक्षा रक्कम दिली असतानाही सुरक्षा मंडळांच्या रक्षकांनी संप सुरू केल्याने शस्त्रधारी सुरक्षारक्षकांविना महापालिकांच्या वास्तूंमधील कारभार सुरू आहे. महापालिका मुख्यालय, गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आदी संवेदनशील ठिकाणी नेमलेले शस्त्रधारी सुरक्षारक्षक संपावर गेल्याने या वास्तूंची सुरक्षा काठीधारी सुरक्षारक्षकांच्या हाती आली आहे.

महापालिकेकडे स्वतःच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी आवश्‍यक असलेली स्वतःची पुरेशी सुरक्षा यंत्रणा नव्हती, त्यामुळे पालिकेने 15 वर्षांपूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे 385 सुरक्षारक्षक नेमले. त्यानंतर स्वतःचे 220 सुरक्षारक्षकही भरती केले आहेत. मात्र, या दोन्ही सुरक्षारक्षकांकडे शस्त्र नसल्याने पालिकेच्या संवेदनशील वास्तूंची सुरक्षा धोक्‍यात आली होती. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या महासभेत अशा वस्तूंच्या रक्षणासाठी आवश्‍यक म्हणून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 155 शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्यात आले.

सध्या या सुरक्षारक्षकांनी पालिकेला कोणतीही सूचना न देता गुरुवारपासून (ता. 21) संप सुरू केला. त्यामुळे संवेदनशील वास्तूंची सुरक्षाच धोक्‍यात आली आहे. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी पुन्हा त्यांचे आणि सुरक्षा बोर्डाचे निःशस्त्र रक्षक या वस्तूंच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत.

Web Title: thane news security guard strike