ढिसाळ नियोजनाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

ठाणे -  रविवारी झालेल्या २८ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये यंदा जोरदार वर्षा झाली असली तरी, ढिसाळ नियोजनाचा फटका मॅरेथॉनला बसला. डीजेवरील बंदी, खड्ड्यांचा मार्ग, मॅरेथॉनची सामग्री स्पर्धकांपर्यंत पोहोचण्यात दिरंगाई, पालिकेच्या उच्चपदस्थांची गैरहजेरी आदी कारणांमुळे मॅरेथॉन यथातथाच पार पडली.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदाही सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मॅरेथॉनसाठी प्रायोजक शोधायला नकार दिल्याने पालिका प्रशासनाची कोंडी झाली होती. त्यानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रायोजकत्वाचा सर्व भार झेलण्याची तयारी दर्शवल्याने मॅरेथॉन झाली; मात्र, स्पर्धेला आयुक्त गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले. 

गेला महिनाभर या मॅरेथॉनसाठी पालिकेच्या क्रीडा विभागाची टीम धावाधाव करत होती; मात्र क्रीडा अधिकाऱ्यासह काही अपवाद वगळता अनेकांनी केवळ हजेरीच लावली. मॅरेथॉनच्या पूर्वसंध्येपर्यंत पालिकेकडे स्पर्धकांची संपूर्ण यादीही नव्हती. बंगळूरहून येणारी काही सामग्री, तर पहाटेच्या सुमारास पोहचल्याने त्याचे वितरण करताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही अनुपस्थिती दर्शवल्याने शिवसेना आमदार-खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवली. आवाहन करूनही ७३ पैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच नगरसेविका उपस्थित राहिल्याने महापौरांनी नाराजी दर्शवली.