नोकरीत ५० टक्के प्राधान्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

ठाणे - स्थानिकाला रोजगार मिळालाच पाहिजे, या भूमिकेसाठी कायम शिवसेनाच आक्रमक असल्याचे चित्र आता पालटू लागले आहे. ठाणे महापालिकेच्या नोकरभरतीत स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले पाहिजे, या विषयावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले होते. त्याला शिवसेनेची साथ मिळाल्यानंतर स्थानिक उमेदवारांना नोकरभरतीत ५० टक्के प्राधान्य देण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला आहे.

गुरवारच्या सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी स्थानिक नोकरभरतीवरून आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर यापुढे महापालिकेत नोकरभरती करताना ठाणे महापालिकेच्या परिसरातील ५० टक्के व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, अशा प्रकारचा ठराव मांडण्यात आला. त्याला सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले.

ठाणे महापालिकेत नुकतीच वाहनचालक, इलेक्‍ट्रिक चेकर, पाणी खात्यातील विविध पदांसाठी नोकरभरती करण्यात आली; पण या भरतीत ठाणे महापालिका परिसरातील एकाचीही निवड झाली नाही, असा मुद्दा पवार यांनी उपस्थित केला. भरतीसाठी जी लेखी परीक्षा घेण्यात आली होती, त्यात जे प्रश्‍न विचारण्यात आले होते त्यांचा आणि या कामांचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ही परीक्षा घेतली जाते. ही पूर्णपणे सरकारच्या निर्देशनानुसार घेतली जाते, असे सांगूनही पवार यांचे समाधान झाले नाही. 

राष्ट्रवादीसह शिवसेनेची सहमती
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशा प्रकारचा कोणताही नियम नाही, असे सांगत स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घ्यायचा असल्यास तसा ठराव महासभेने करावा, अशी सूचना केली. चर्चेनंतर ठराव मांडून त्याला अनुमोदन देण्यात आले. हा ठराव कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याबद्दल साशंकता असली तरी स्थानिक उमेदवारांच्या भरतीवरून भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर राष्ट्रवादीसह शिवसेनेचीही त्यावर सहमती मिळविण्यात भाजप यशस्वी झाल्याचे पाहावयास मिळाले.