उल्हासनगरला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

दिनेश गोगी
शनिवार, 29 जुलै 2017

उल्हासनगर - महापालिकेचा दर्जा मिळून २१ वर्षे झालेल्या उल्हासनगरने आता स्वतःचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यास हिरवा कंदील दाखवल्याने अंबरनाथ तालुक्‍यात किमान २० एकर जागेची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

उल्हासनगर - महापालिकेचा दर्जा मिळून २१ वर्षे झालेल्या उल्हासनगरने आता स्वतःचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यास हिरवा कंदील दाखवल्याने अंबरनाथ तालुक्‍यात किमान २० एकर जागेची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

अवघ्या १३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसलेल्या उल्हासनगरला १९९६ ला महापालिकेचा दर्जा मिळाला आहे. या घडीला रेकॉर्डवर साडेपाच लाखांच्या आसपास लोकसंख्या असली, तरी ती सुमारे दहा लाखांच्या पुढे असल्याचे चित्र दाटीवाटीने राहणाऱ्या नागरिकांना पाहून दिसते. शहरात दोन डम्पिंग ग्राऊंड आहेत. कॅम्प एकमध्ये म्हारळ गावाजवळ टेकडीवर असलेले सर्वात जुने डम्पिंग बऱ्याच वर्षांपासून ओव्हरफ्लो होत असल्याने कॅम्प पाचमध्ये दुसऱ्या पर्यायी डम्पिंगचा तोडगा काढण्यात आला आहे. प्राचीन शिवमंदिरासह अनेक धार्मिक स्थळे या परिसराच्या सभोवताली असल्याने शिवसेनेने हे डम्पिंग बंद करण्याची मागणी केली आहे. 

संपूर्ण उल्हासनगरातून तब्बल ४१० टन ओला, सुका कचरा डम्पिंगवर टाकण्याची जबाबदारी कोणार्क कंपनीला देण्यात आली आहे. त्यासाठी साडेचार लाख रुपयांच्या घरात रोजचे बिल कोणार्कला दिले जाते. डम्पिंगवरील कचरा स्प्रेइंग करून कुजवला जातो. कचऱ्याची वाढती क्षमता बघून प्रभागनिहाय डम्पिंग तयार करून त्यावर खत, वीजनिर्मिती अशी प्रक्रिया करण्याची भूमिका पालिकेने घेतली होती; मात्र डम्पिंगची लांबलचक प्रणाली, त्यात तांत्रिक अडचणी येण्याची शक्‍यता असल्याने पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी थेट उल्हासनगरातील कचऱ्यावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची आणि त्यासाठी जागा देण्याची विनंती ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली. कल्याणकर यांनी त्यास हिरवा कंदील दिला असून अंबरनाथ तालुक्‍यातील सरकारच्या अधिपत्याखालील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन-चार दिवसांत जागेची पाहणी
अंबरनाथमधील जागा दाखवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी अंबरनाथ तहसीलदार प्रशांत जोशी यांना कल्याणकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार तीन-चार दिवसांत आयुक्त निंबाळकर, तहसीलदार जोशी, उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी, एकनाथ पवार हे जागेची पाहणी करणार आहेत. किमान २० एकर जागा मिळाल्यावर तिथे घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचऱ्यावरील प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यातून गॅस, वीज, खतनिर्मितीचा संकल्प उल्हासनगर पालिकेचा आहे.

Web Title: thane news ulhasnagar municipal corporation