वालधुनीतील रसायनामुळे उलट्या, जुलाब

दिनेश गोगी
मंगळवार, 27 जून 2017

उल्हासनगर  - शहरात शनिवारी (ता.२४) मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीसह नाल्यांना पूर येताच केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडले. जीवघेण्या उग्र वासाने रात्रभर नागरिक भयभीत झाले. अनेकांना उलट्या, जुलाबाचा त्रास झाला. ‘कायद्याने वागा लोकचळवळी’ने याला वाचा फोडली.

उल्हासनगर  - शहरात शनिवारी (ता.२४) मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीसह नाल्यांना पूर येताच केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडले. जीवघेण्या उग्र वासाने रात्रभर नागरिक भयभीत झाले. अनेकांना उलट्या, जुलाबाचा त्रास झाला. ‘कायद्याने वागा लोकचळवळी’ने याला वाचा फोडली.

रविवारी (ता.२५) रात्री वालधुनी नदीच्या आणि नाल्यातील पुराच्या वाहत्या पाण्यात पुन्हा केमिकलचे घातक रसायन सोडण्यात आले. सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, ३ नंबर ओटी, लालचक्की, महाराजा हॉल, हिराघाट, शांतीनगरपर्यंत उग्र वास पसरताच नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. नागरिकांनी विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात फोन करून सूचना दिली. ‘कायद्याने वागा लोकचळवळ’ या संघटनेचे राज असरोंडकर, कल्पेश माने, मनोज पाटील आदींनी  पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेचे प्रमुख बाळू नेटके यांच्यासोबत जाऊन नागरिकांची विचारपूस केली. 

पालिका नोटिसा बजावणार
बाहेरच्या शहरातील केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडले असावे. रेसिडेंट किंवा सभोवताली केमिकलचे, जिन्स वॉशचे कारखाने आहेत. त्यांच्याकडून हे रसायन सोडण्यात आल्याची शक्‍यता आहे. त्यांना याविषयी नोटीस बजावण्यात येणार असून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती उल्हासनगर पालिकेचे मुख्यालय उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

केमिकल माफिया हे नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळत आहेत. ही गंभीर बाब असून, रविवारी (ता. २५) रात्री सोडण्यात आलेल्या रसायनांची आणि त्यामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली आहे. दोन दिवसांत यावर मंत्रालयात बैठक होणार आहे. अशा मंडळींना वठणीवर आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. 
- राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, उल्हासनगरपालिका