कळव्यात रुळांमध्ये कचऱ्याच्या गोण्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

ठाणे - मध्य रेल्वे मार्गावरील कळवा स्थानकातील रुळांवरील गटारांवर जमा करण्यात आलेल्या कचऱ्याच्या गोण्या सध्या कळवा स्थानकाच्या सौंदर्यात बाधा ठरत आहेत. या कचऱ्याच्या गोण्या रेल्वे प्रशासनाने तत्काळ हटवाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. रेल्वे रुळांच्या बाजूला पडलेला कचरा उचलण्यासाठी रेल्वे कचरागाडी चालवते; मात्र या गाडीने दोन आठवडे हा कचरा उचलून नेला नसल्याने या कचऱ्याच्या गोण्या येथेच पडून आहेत. या गोण्यांवरच लोकलमधील प्रवासी पान-गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून अस्वच्छतेत आणखी भर टाकत आहेत. 

रेल्वे रुळांची, फलाटांची किंवा संरक्षक भिंतींची कामे करताना खूप माती, सिमेंट, खडी आणि इतर कचराही जमा होतो. रेल्वेचे कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार रेल्वे रुळांमधील कचरा गोळा करून तो या रुळांच्या बाजूलाच एकत्र करून ठेवतात. कळवा स्थानकातही रेल्वे प्रशासनातर्फे विविध विकासकामे सुरू असल्याने येथे रोज कचरा जमा होतो. हा कचरा गोण्यांत भरून कळवा रेल्वेस्थानकातील रेल्वे रुळांमध्ये असलेल्या गटारांवर ठेवण्यात आला आहे. लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी येता-जाता या गोण्यांवर पानाच्या, गुटख्याच्या पिचकाऱ्या मारतात. त्यामुळे सफेद गोण्यांचा रंग गुलाबी, लाल झाल्याचे दिसते. हा सर्व प्रकार किळसवाणा असून यामुळे स्थानकाला अस्वच्छतेचे रूप येते. पावसाळाही जवळ येऊ लागला असून, पावसाळ्याआधी स्थानकात जमा होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. 

कचरा हटवण्याची ग्वाही 
मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या डागडुजीचे काम सुरू असून, यामुळे रोज रेल्वे रुळांलगत मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. कचरा एकत्रित जमा करून रेल्वेच्या ठराविक जागांमध्ये भराव म्हणून टाकण्यात येतो. पावसाळ्याआधी नाल्यांची सफाईही करण्यात येणार असून, गटारांवर ठेवण्यात आलेला कचरा हटवण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

खडी आणि मातीने भरलेली गोणी रेल्वे रुळांच्या मध्येच ठेवण्यात आलेली आहेत. 10-12 दिवस ही गोणी तेथेच आहेत. तसेच काही गोणीतर चक्क रेल्वे रुळांमधील गटारातच ठेवण्यात आली आहेत. प्रवासी या गोण्यांवरच थुंकत असल्याने ते सारे घाण वाटते. स्थानक स्वच्छ ठेवण्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे. 
- लता जाधव, प्रवासी 

पावसाळा तोंडावर आला असून, गटारात टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या गोण्या हटवण्यात याव्यात. कळवा स्थानकात दर वर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडतात. यामुळे रेल्वेने आधीच जास्त कचरा जमा होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी. 
- विनित देसाई, प्रवासी 

Web Title: thane news Waste boxes in the railway track