थर्टी फर्स्टवर रोकड टंचाईचे सावट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नेरूळ  - नोटाबंदीच्या निर्णयानंतर विविध क्षेत्रांप्रमाणे पर्यटन क्षेत्रावरही नोटबंदीचा विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी नववर्षाचे स्वागत जोरदार उत्साहात केले जाते. मात्र, यंदा चलन टंचाईमुळे नागरिकांनी हात आखडता घेतला आहे. यंदा बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या तुरळक असून, अनेक जणांनी पर्यटनस्थळांऐवजी घरातच पार्टी वा नजीकच्या हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन निश्‍चित केला आहे.

दरवर्षी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध हॉटेलांमध्ये विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते; परंतु अशा पार्ट्यांच्या बुकिंगलाही फटका बसला आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटनप्रेमी नागरिकांकडून गोवा, अलिबाग, मुरूड अशा जवळच्या ठिकाणांची निवड केली जाते; तर काही जण सिंगापूर, मलेशिया आदी ठिकाणी जातात; परंतु यंदा पर्यटकांचे प्रमाण कमी झाले असून, ट्रॅव्हल एजन्सीच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.

यंदा मित्र-मंडळींनी एकत्र येऊन सोसायट्यांमध्येच पार्टीचे बेत आखले आहेत. काही जणांनी दूरच्या ठिकाणाऐवजी शहरातील हॉटेलमध्येच पार्टी करण्याचे ठरविले आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात मोठी घट झाली आहे.

मुळातच हातात पैसे नसून, रोकड मिळवण्यासाठी बॅंक व एटीएममध्ये धावाधाव करावी लागते. त्यामुळे या वर्षी नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धामधुमीत करता येणार नाही. नोटबंदीने सामान्यांसह विविध व्यवसायावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे सेलिब्रेशनवर मर्यादा आल्या आहेत.
- दिनेश शर्मा, नागरिक

नोटबंदीचा परिणाम ट्रॅव्हल्स व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. दरवर्षी नवीन वर्षासाठी बाहेरगावी वा पर्यटनस्थळी जाणाऱ्यांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात होते; परंतु या वर्षी व्यवसायाला खूप फटका बसला आहे. नोटबंदीनंतर सत्तर टक्के व्यवसाय कमी झाला आहे. नागरिकांच्या हातात मुबलक पैसाच मिळत नाही. त्यामुळे मौजमजेच्या आनंदासाठी नागरिकांनी हात आखडता घेतला.
- पी. विजयन, शबरी टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स

Web Title: Thirty First of cash scarcity shadow