तुर्भेकर आगीतून फुफाट्यात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेने तुर्भे एमआयडीसीत विकसित केलेल्या क्षेपनभूमीतील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मेटाकुटीला आलेल्या तुर्भेवासीयांनी डम्पिंग हटावचा नारा दिला. त्यासाठी अनेक आंदोलने केली. हा प्रश्‍न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेला. त्यानुसार त्यांनी हे डम्पिंग हलवण्याचे आश्‍वासन दिले; परंतु ते तेथीलच संजीवनी दगड खाणीत हलवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.

एमआयडीसीतील डम्पिंग दगड खाणीत हलवण्यात येणार असल्यामुळे तुर्भे स्टोअर येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे; परंतु त्याचा त्रास हनुमाननगर येथील रहिवाशांना होणार आहे. यामुळे याच परिसरात कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संजीवनी दगडखाणीतील डम्पिंगमुळे हनुमाननगरमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत.

अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी, महापालिका शाळेतील विद्यार्थी आणि या परिसरातील कामगार हैराण झाले आहेत. उलट्या, मळमळणे, डोळे चुरचुरणे, दमा आदी त्रासांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळही लक्ष देत नाही. त्यामुळे येथील उद्योग सुरू ठेवायचा की बंद करायचा, असा प्रश्‍न उद्योजक विचारत आहेत. तुर्भे एमआयडीसीत पालिकेचे अद्ययावत आणि घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारी क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आहे. सुमारे १०० हेक्‍टर जमिनीवरील हे डम्पिंग नागरी वस्तीसाठी धोकादायक बनले आहे. डम्पिंगच्या दुर्गंधीने नागरिक कासावीस झाले आहेत. त्यामुळे या परिसरात डम्पिंग नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

आंदोलनाचा इशारा
सरकारच्या निर्णयाने संजीवनी दगड खाणीत डम्पिंग हलवण्यात येणार असल्यामुळे त्याचा त्रास हनुमाननगरमधील रहिवाशांना होणार आहे. त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला आहे. वस्ती नसलेल्या ठिकाणी हे डम्पिंग हलवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हनुमाननगरमधील नागरिक अगोदरच डम्पिंगच्या घाणीमुळे क्षयसारख्या आजाराचा सामना करत आहेत. असे असताना हे डम्पिंग दगड खाणीत हलवले तर मरण घराशेजारी आल्यासारखे होईल. तेव्हा सरकारने हा निर्णय बदलला नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी दिला आहे.