रामगोपाल वर्मा व जितेंद्र आव्हाड यांच्यात 'ट्विटयुद्ध'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

या ट्विट प्रकरणी राम गोपाल वर्मा अडचणीत सापडले असून, त्यांच्याविरोधात गोव्यात सामाजित कार्यकर्त्या विशाखा म्हांब्रे यांनी तक्रार दाखल केली आहे.

मुंबई - महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी केलेल्या एका ट्विटमुळे वाद निर्माण झाला असून, राम गोपाल वर्मा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलाच वाद झाल्याचे पहायला मिळाले. 

राम गोपाल वर्मा यांनी सनी लिऑनचा संदर्भ देत महिलांनो हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिऑनलसारखा पुरुषांना आनंद द्या, असे आक्षेपार्ह ट्विट केले होते. यावर जितेंद्र आव्हाड यांनी राम गोपाल वर्मांना माफी मागण्याचा इशारा दिला. या ट्विटला प्रत्युत्तर देत वर्मा यांनी उत्तम, लोकशाही देशात कायदा हातात घेण्याची धमकी दिल्याबद्दल शरद पवार यांनी तुम्हाला हाकलून द्यायला हवे. तुम्ही पवारांच्या विचारधारेला कलंक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आव्हाड यांनी तुमचा पत्ता द्या आणि बघा… तुम्हाला आई नाही का? असे ट्विट केले. 

कायदा हाती घेण्याची धमकी दिल्याबद्दल माफी न मागितल्यास मी रितसर तक्रार दाखल करेन. काय करु ते सांगा असा प्रश्न वर्मा यांनी विचारला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आव्हाडांनी ‘आगे बढो’ असे ट्विट केले आहे. 

दरम्यान, या ट्विट प्रकरणी राम गोपाल वर्मा अडचणीत सापडले असून, त्यांच्याविरोधात गोव्यात सामाजित कार्यकर्त्या विशाखा म्हांब्रे यांनी तक्रार दाखल केली आहे.