विमान अपहरणाचा ई-मेल पाठवणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - विमान अपहरणाचा बनावट ई-मेल पाठवणाऱ्या दोघांना सहार पोलिसांनी काल अटक केली. मोटापार्थी वामशी कृष्ण ऊर्फ वामशी चौधरी आणि कुडूमला राजू यादगिरी अशी त्यांची नावे आहेत. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मुंबई - विमान अपहरणाचा बनावट ई-मेल पाठवणाऱ्या दोघांना सहार पोलिसांनी काल अटक केली. मोटापार्थी वामशी कृष्ण ऊर्फ वामशी चौधरी आणि कुडूमला राजू यादगिरी अशी त्यांची नावे आहेत. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

सहा व्यक्ती हैदराबाद, चेन्नई तसेच मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांचे अपहरण करणार असल्याचे नमूद करणारा ई-मेल मुंबईतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला आला होता. त्यानंतर तिन्ही विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तपासादरम्यान तो ई-मेल बनावट असल्याचे उघड झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे हैदराबाद पोलिसांनी मोटापार्थी आणि कुडूमलाला ताब्यात घेतले. सहार पोलिसांनी त्या दोघांविरोधात विमान अपहरणाची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यांना अटक करण्यासाठी सहार पोलिसांचे पथक हैदराबादला गेले होते. बुधवारी त्या दोघांनाही मुंबईत आणण्यात आले. 

मोटापार्थीच्या प्रेयसीला मुंबई आणि गोव्याला विमानाने प्रवास करायचा होता. त्यासाठी मोटापार्थीकडे पैसे नव्हते. प्रेयसी नाराज झाल्यास ती दूर जाईल, या भीतीतून त्याने 15 एप्रिलला पोलिसांना बनावट ई-मेल पाठवला. त्यानंतर विमानतळांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याने काही दिवस विमानप्रवास करता येणार नाही, असे मोटापार्थीने प्रेयसीला सांगितले होते. तिनेही त्याच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवला होता, अशी माहिती तपासात समोर आली. मोटापार्थी आणि यादगिरी यांची चौकशी सुरू असल्याचे सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबूराव मुखेडकर यांनी सांगितले.