उद्धव ठाकरे उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

प्रभागांवर नेत्यांचा वॉच; पक्षश्रेष्ठींना दर दीड-दोन तासांनी अहवाल

प्रभागांवर नेत्यांचा वॉच; पक्षश्रेष्ठींना दर दीड-दोन तासांनी अहवाल
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीचा दिवस आणि रात्र सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असते. या वेळेत झालेली लहान चूकही घातक ठरू शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष दक्ष होते. नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी प्रत्येक प्रभागाचा हालहवाल जाणून घेत प्रत्येक दीड-दोन तासांनी पक्षश्रेष्ठींना माहिती देत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी मुंबईतील काही प्रभागांना भेटी दिल्या.

निवडणुकीसाठी जाहीर प्रचार थांबला असला तरी छुपा प्रचार सोमवारी सकाळपासून सुरू झाला. रात्रीपर्यंत अशाप्रकारे प्रचार सुरूच होता.

पक्षातील नाराजी आयत्यावेळी घात करू नये म्हणून या नाराजांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत होते, तर पक्षाच्या नेहमीच्या मतदारांना आयत्यावेळी विरोधकांनी फोडू नये म्हणून कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. या सर्व घडामोडींवर पक्षाचे नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी लक्ष ठेवून होते. त्यांचे अहवाल दर दीड-दोन तासांनी पक्षश्रेष्ठींना पोहचवले जात होते.

प्रचाराची रणधुमाळी थांबल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरले होते. रविवारी रात्री त्यांनी दक्षिण-मध्य मुंबईतील शिवसेना शाखांना भेटी दिल्या. त्यानंतर सोमवारी पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्यासह दहिसर, बोरिवली, तसेच घाटकोपरमधील शाखांना भेटी दिल्या. पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांना शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरावे लागल्याची चर्चा होती. ठाकरे स्वत: पक्षाच्या विभाग प्रमुखांकडूनही प्रभागांचा आढावा घेत होते.

Web Title: uddhav thackeray on road for municipal election