वासुदेवाकरवी मतदानासाठी साकडे 

वासुदेवाकरवी मतदानासाठी साकडे 

ठाणे - निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असताना मतदारांना गाठण्याची एकही संधी उमेदवारांनी दवडली नाही. यंदा चार प्रभागांचे एक पॅनेल असल्याने प्रभागांच्या सीमा विस्तारल्या आहे. त्यामुळे अवाढव्य प्रभागांमध्ये प्रचार करून दमलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या अखेरच्या रविवारी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदारांना गाठून प्रचाराची संधी साधली. काही उमेदवारांनी थेट वासुदेवाकरवी भल्या पहाटे दारोदारी मतदानाचे आवाहन करून मतांचे दान पदरात पाडण्याची क्‍लृप्ती लढवली. 

पालिकेच्या 131 जागांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी पंधरवडाभर प्रचाराची धूम उडवली आहे. पहिल्या रविवारच्या सुट्टीत उमेदवारी निश्‍चित झाल्या नसल्याने सर्वच इच्छुकांनी पक्षीय चिन्हांचे प्रबोधन केल्यानंतर 12 फेब्रुवारीच्या दुसऱ्या रविवारी रिंगणात उरलेल्या उमेदवारांनी चार मतांच्या दानाचे साकडे मतदारांना घातले; मात्र अवाढव्य मतदारसंघात प्रचारासाठी पायपीट करून दमछाक झाल्याने अखेरच्या रविवारी उमेदवारांनी थेट मॉर्निंग वॉकची ठिकाणे गाठून मतदारांना विनवण्या केल्या. भल्या पहाटे भावी नगरसेवकाला रस्त्यावर उतरलेला पाहून अनेकांना अचंबा वाटला. दरम्यान, एकीकडे प्रचाराचा असा फंडा अवलंबला जात असताना काही उमेदवारांनी, स्वत:ऐवजी आपल्या कार्यकर्त्यांसोबत पिढ्यान पिढ्या पहाटेच्या सुमारास दारी अवतरणाऱ्या वासुदेवाकरवी प्रचाराची संधी साधली. आपल्या भारदस्त आवाजात उमेदवाराची भलामण करणारी गीते गाऊन वासुदेवाने मतदारराजाचे कान तृप्त केले. एरव्ही, वासुदेवाचे दिसणे तसे दुर्मिळ; मात्र निवडणुकीच्या निमित्ताने गल्लीबोळात प्रचारासाठी अवतरलेल्या वासुदेवांनी मतदारांचे कुतूहल जागवले. हाती चिपळ्या व टाळ घेऊन पायातील चाळ नाचवत, स्वत:भोवतीच गिरक्‍या घेत "मतांचं दान टाका...दान पावेल...' असा आशीर्वाद देत दारोदारी हिंडणाऱ्या वासुदेवाने उमेदवाराच्या चिन्हांचा खुबीने प्रचार केला. 

बिदागीवर प्रचार 
ग्रामीण भागात पहाटे-पहाटे भक्तिसंगीत आळवीत प्रबोधन करणारे "वासुदेव' हे ग्रामस्थांना देवाचा अवतार वाटतात. श्रीकृष्णाचा अंश वासुदेवात दिसतो; त्यामुळे कृष्णाप्रमाणेच वेष केला जातो. ठाण्यात प्रचार करणारा मूळचा अमरावतीचा वासुदेव विकी वानखेडे हा ऐरोलीत राहतो. तो बारावी उत्तीर्ण आहे. एका एनजीओमार्फत चार-पाचशेच्या बिदागीवर प्रचाराचे काम मिळते. दारोदारी फिरताना एरव्ही भिक्षा मिळते; पण उमेदवाराकडून बिदागी मिळत असल्याने प्रचारादरम्यान नागरिकांकडून काहीही घेत नाही, असे त्याने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com