शहरात चंगळ; गावांत टंचाई 

शहरात चंगळ; गावांत टंचाई 

ठाणे -  ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना आणि ग्रामीण भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात प्रचंड मोठी तफावत आहे. शहरात प्रति व्यक्ती 200 लिटर्स पाणीपुरवठा होत असताना ग्रामीण भागातील गावकऱ्यांना 40 लिटर्स पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरांना पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे ही ग्रामीण भागात असूनही गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्‌ मैल पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील महापालिका पाण्याच्या दृष्टीने तुपाशी; तर ग्रामीण भागातील नागरिक मात्र पाण्याविना उपाशी असल्याचे चित्र आहे. ठाणे शहराचा विचार करता शहराच्या तुलनेत मुंब्रा आणि दिवा भागात पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. 

ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. जानेवारी-फेब्रुवारीतच पाणीकपातीचे वेळापत्रक 30 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले होते. त्या तुलनेत यंदा पाण्याची स्थिती समाधानकारक आहे, असे असले तरी अतिरिक्त पाणी उचलण्याच्या सवईमुळे ठाणे जिल्ह्यातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. ऑक्‍टोबरपासून ठाणे जिल्ह्यात एक दिवसाच्या पाणीकपातीला सुरुवात झाली होती. मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत पाण्याची स्थिती समाधानकारक असल्यामुळे अतिरिक्त पाणीकपात कमी करण्यात आली. एप्रिलमध्ये याविषयी पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली. 

ठाणे जिल्ह्यात बारवी आणि आंध्रा धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेता यात सुमारे 150 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. पुढील 100 दिवसांसाठी हे पाणी पुरेसे असून ऑक्‍टोबरपासून सुरू केलेल्या पाणीकपातीमुळे हा पाणीसाठा पुरेसा आहे. जिल्ह्यात अतिरिक्त पाणीकपात करण्याची गरज भासणार नाही. 
- उमेशचंद्र पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, ठाणे. 

अतिरिक्त पाणीमंजुरी 
ठाणे जिल्ह्यात आंध्रा आणि बारवी धरणातून वर्षाला सुमारे 438 दशलक्ष घनमीटर पाणी मिळते. ते उचलणाऱ्या संस्थांना या भागातून 452 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची मंजुरी देण्यात आली आहे. उल्हास नदीतून मिळणारे पाणी आणि प्रत्यक्ष पुरवठा यात तफावत असून ही तफावत भरून काढण्यासाठी ऑक्‍टोबरपासूनच पाण्याचे नियोजन करून एक दिवसाची कपात घ्यावी लागत आहे, असे उमेशचंद्र पवार यांनी सांगितले. 

शहरात पाण्याची नासाडी 
मागील वर्षीच्या दुष्काळसदृश स्थितीमुळे शहरवासीयांना पाण्याचे महत्त्व समजू लागले असले, तरी पाण्याच्या वापराविषयी आजही शहरी भागामध्ये गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. इमारत स्वच्छ करणे, गाड्या धुणे, हात धुणे, कपडे-भांडी धुणे, बागेमध्ये पाणी घालणे यासाठी लाखो लिटर्स पाण्याची अक्षरश: नासाडी होताना दिसते. त्याच वेळी ग्रामीण भागात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासत असते. शहापूर तालुक्‍यात सर्वाधिक टॅंकरग्रस्त गावे आहेत. 

ठाणे महापालिका क्षेत्रात चार मुख्य जलस्रोतांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. भातसा धरणातून होणारा पाणीपुरवठा हा शहराचा मुख्य पाणीस्रोत आहे. पालिकेकडे प्रति व्यक्ती प्रतिदिन सरासरी 200 लिटर्सच्या आसपास पाणीपुरवठा होतो. सध्या प्रति व्यक्ती 180 लिटर्स पाण्याची मागणी असून एकूण 328.79 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी आहे. शहराला जुलैपर्यंत पाणीपुरवठा होईल, इतके पाणी आहे. सध्या शहरात एक तास पाणीकपातीचे वेळापत्रक लागू आहे. या काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना पाणी दिले जाते. 
- रवींद्र खडताळे, उपनगर अभियंता, ठाणे महापालिका, पाणीपुरवठा विभाग. 

मंजूर कोट्यापेक्षा अतिरिक्त पाणी उचला... 
ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा प्राधिकरणांना लघु पाटबंधारे विभागाने दिलेल्या पाणी कोट्यापेक्षा अधिकचा पाण्याच उचल केली जात आहे. प्रत्यक्षात प्रति दिन एकूण 1240 दशलक्ष लिटर पाणी उचलण्याची मंजुरी असताना सर्व प्राधिकरणे दिवसाला सुमारे 1450 दशलक्ष लिटर्स पाणी उचलत आहेत. बारवी धरणातून 700 दशलक्ष लिटर्स आणि आंध्रातून 700 दशलक्ष लिटर्स पाणी रोज सोडले जाते. बदलापूर, जांभूळ आणि मोहने बंधाऱ्यावर हे पाणी या संस्था उचलतात. विशेष म्हणजे यापेक्षा अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, यासाठीही अनेक मागण्या पाणीपुरवठा विभागाकडे केल्या जात आहेत. 

प्राधिकरणे, मंजूर पाणीसाठा (द.ल.लि.), प्रत्यक्षातील उचल (द.ल.लि.), अतिरिक्त मागणी (द.ल.लि.) 

एमआयडीसी 583, 700, 623 
स्टेम 285, 300, 350 
केडीएमसी 234, 320, 140 
ग्रामपंचायती 0.6, 8, - 
औद्योगिक कंपन्या 28, 32, - 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 90, 97, - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com