पश्‍चिम, मध्य रेल्वेवर ऑक्‍टोबरपासून 75 नव्या फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - मध्य आणि पश्‍चिम रेल्वेमार्गावर ऑक्‍टोबरपासून 75 नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद यांनी सोमवारी (ता. 8) येथे दिली.

मुंबई - मध्य आणि पश्‍चिम रेल्वेमार्गावर ऑक्‍टोबरपासून 75 नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद यांनी सोमवारी (ता. 8) येथे दिली.

जमशेद यांनी उपनगरी लोकल सेवेचा आज आढावा घेतला. लोकल सेवेच्या वक्तशीरपणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले; परंतु त्यात आणखी सुधारणा करण्याचीही सूचना केली. देशातील रेल्वे प्रवाशांच्या तुलनेत मुंबईतील लोकल प्रवाशांची संख्या अधिक आहे. या वाढत्या प्रवासी संख्येचा वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन ऑक्‍टोबरपासून नवीन लोकल फेऱ्या सुरू करण्यात येतील. दादर, वांद्रे आणि त्यापुढील भागातील प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे त्यांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी या लोकल फेऱ्या वाढवण्यावर आणि काही फेऱ्यांचा विस्तार करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याची माहिती जमशेद यांनी दिली.

या संदर्भात रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या ऑक्‍टोबरपासून लागू होणाऱ्या वेळापत्रकात या फेऱ्यांचा समावेश केला जाईल. 75 फेऱ्यांपैकी मध्य रेल्वेवर 40 आणि पश्‍चिम रेल्वेवर 35 फेऱ्या सुरू करण्यात येतील. मध्य रेल्वेच्या एकूण 40 फेऱ्यांमध्ये मेन लाईनवर 12 आणि हार्बर व ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गांवर प्रत्येकी 14 फेऱ्या चालवल्या जातील. मेन लाईनवरील नवीन फेऱ्या ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा प्रवाशांना दिलासादायक ठरतील. पश्‍चिम रेल्वेवरील 35 फेऱ्यांमध्ये 10 फेऱ्या नव्या 15 डबा लोकलच्या असतील. यातील बहुतेक फेऱ्या अंधेरी ते विरार दरम्यान चालवल्या जातील.

दिलासा...
- जास्तीत जास्त एसी लोकल चालवण्याचा प्रयत्न
- रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्याचे प्रयत्न
- रेल्वे फाटकांच्या ठिकाणी रोड ओव्हर ब्रीज बांधण्याचा प्रयत्न
- 15 डबा लोकल वाढवण्याचा विचार
- प्रवाशांच्या प्रश्‍नांचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती

वेळ कमी करण्याची सूचना
जादा फेऱ्या चालवण्यासाठी दोन लोकल दरम्यानचा वेळ कमी करण्याची सूचना आपण रेल्वे प्रशासनाला केली असल्याचे मोहम्मद जमशेद यांनी सांगितले. दोन ते तीन मिनिटांनी ट्रेन धावल्या, तर प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल. अर्थात, त्यासाठी सिग्नल यंत्रणेत आणि वेळापत्रकातही काही बदल करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: western central railway 75 new round