ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. तलवार, पट्टा, बाणा, भाला, तीर-कमान, कट्यार, बिछवा, जांभिया, वाघनखं अशी अनेक शस्त्रांची लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ही शस्त्रे तयार करणे, ही एक कला आहे. त्याचप्रमाणे ती चालविणे, हे शौर्याचे काम आहे. पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा म्हणून ही शस्त्रे आजही घरोघरी पूजली जातात. कालौघात शस्त्रांसह दैनंदिन वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे पूजन जरी होत असले, तरी युद्धात वापरलेल्या शस्त्रांची पूजा ही विशेषच आहे.  

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. तलवार, पट्टा, बाणा, भाला, तीर-कमान, कट्यार, बिछवा, जांभिया, वाघनखं अशी अनेक शस्त्रांची लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ही शस्त्रे तयार करणे, ही एक कला आहे. त्याचप्रमाणे ती चालविणे, हे शौर्याचे काम आहे. पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा म्हणून ही शस्त्रे आजही घरोघरी पूजली जातात. कालौघात शस्त्रांसह दैनंदिन वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे पूजन जरी होत असले, तरी युद्धात वापरलेल्या शस्त्रांची पूजा ही विशेषच आहे.  

शिवकालीन युद्धकलेच्या निमित्ताने शस्त्रे शहरातील आखाड्यांत पाहायला मिळतात. काही शस्त्रे अगदी तीनशे वर्षांपूर्वीची आहेत. नव्याने तयार केलेल्या शस्त्रांचाही आखाड्यांत समावेश केला आहे. शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात जोखीम असली, तरी शौर्याचा हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केला जातो आहे. शस्त्रांच्या बाबत सांगायचे तर तलवारीच्या आकारावरून तिचे वेगवेगळे प्रकार आहेत.

खांडा, तेगा, कर्नाटकी धोप (फिरंग) यासह आरमार, पायदळ व घोडदळात वापरण्यात येणाऱ्या तलवारींचा यात समावेश होतो. मराठा सैनिकांकडे प्रामुख्याने कर्नाटकी धोप असायची. त्याचबरोबर वाघनखे, बिचवा, कट्यार असायची. कर्नाटकी धोपचे पाते ३६ ते ३८ इंच लांबीचे व मूठ आठ इंच लांबीचे आहे. ही तलवार एकधारी असून, जेधे, शिंदे, पासलकर, पेशवे आदी शिवकाळातील गाजलेल्या मानकरी घराण्यात ही तलवार वापरात होती. तलवार व पट्टा यांचे तडफी, सरका, डुबी, काटछाट, हुल, गर्दनकाटचा सराव केळीच्या खांबावर केला जाई. 

ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश जाधव म्हणतात, ‘‘तलवारीच्या मुठीवरूनच तलवारीचे सुमारे चाळीस उपप्रकार होतात. तलवारीचे नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे सुमारे बावीस भाग दाखविता येतात. तलवारीचे पाते पोलादी असे. ते टोलेडो, चंद्रवट, हात्तीपागी, फारशी, जव्हारदार प्रकारचे असे. सासवडजवळील सोनोरी गावाचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली खांडा तलवार सुमारे ४२ किलो वजनाची आहे.

‘‘पट्टा हा तलवारीचा एक प्रकार मानला जातो. त्याचे सरळसोट आकाराच्या पट्ट्याचे पाते ४० इंच असून, त्यास जोडलेली मूठ ही १० ते ११ इंच असे. त्याचबरोबर पट्ट्याचे पाते लवचिक, तर काहींचे कठीण असे. पट्ट्याला मराठा मुठी बसविल्या जात होत्या. विशेष म्हणजे या तलवारींची निगा राखणारे लोक होते. ते शिकलगार म्हणून ओळखले जात. भाल्याच्या जातकुळीतील विटा, भाल्यापेक्षा मोठे असलेले सांग, अणकुचीदार गुर्ज या शस्त्रांनाही त्या काळात महत्त्व होते. 

साधारणपणे शस्त्रांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते. त्यातील पहिला प्रकार असि व दुसरा असिपुत्रिका. असि गटात मोठी शस्त्रे, तर असिपुत्रिकामध्ये लहान शस्त्रांचा समावेश होतो. कट्यार, बिचवा, खंजीर, सुरा, कर्द, पेशकबज, चिलानम, जांबिया ही शस्त्रे असिपुत्रिका गटात मोडतात. त्यांच्या मुठी चांदी, लाकडी, संगमरवरी, लोखंडी, पितळी, हरणाच्या शिंगाच्या, हस्तिदंती असत. चिलखत व शिरस्त्राण या शरीरसंरक्षक साधनांच्या वर्गात ढाल येते. तिचे चौकोनी, अर्धगोलाकार, दुकोनी अर्धगोलाकार, त्रिकोणी, इंग्रजी आठ अक्षरयुक्त, सपाट (फलक) असे प्रकार आढळतात. ढालीचा पृष्ठभाग गेंडा, कासव, हत्ती, बैल, वाघ, जनावरांची कातडी, लाकूड, बांबू, वेत व धातूंचे पत्रे यापासून तयार केला जात असे. सांबर, रेडा, नीलगाय यांच्या कातड्याचासुद्धा ढालीसाठी उपयोग केला जात असे. 

विटा, महत्त्वाचे शस्त्र...
विटा हेसुद्धा एक महत्त्वाचे शस्त्र आहे. मराठे त्याचा वापर लढाईत करत. हाताला दोरी बांधून निमुळत्या धारदार पात्याने शत्रूचा वेध या शस्त्राने घेतला जात असे. आजही या शस्त्राचे विविध आखाड्यांत प्रात्यक्षिक सादर केले जाते. शत्रूने चोहोबाजूंनी वेढल्यास विट्यासह बाणा, दुहेरी बाणा, तलवार, पट्टा यांच्या साह्याने शत्रूवर आक्रमकपणे वार केले जात. ही शस्त्रे अनेक लढायांची मूक साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांचा अभिमान प्रत्येकाला असणे साहजिक आहे. खंडेनवमीच्या निमित्ताने या शस्त्रांचे पूजन आणि स्मरण करून या शस्त्रकलेचे प्रत्येकाने प्रशिक्षण घ्यायला हवे. ज्यामुळे आपल्या शौर्याचा वारसा पिढ्यान्‌पिढ्या हस्तांतरित होत राहील.

आधुनिक शस्त्रांनी पोलिस दलही सज्ज
कायदा सुव्यवस्थेबाबत कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस दल आधुनिक शस्त्रांनी सज्ज होत आहे. बारा बोअर बंदूक ते अत्याधुनिक ए. के. १०३ दलात दाखल झाली आहेत. शस्त्रे हाताळण्याचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्याचे काम प्रशासनाकडून जिल्हा पातळीवर वेळोवेळी केले जाते. पूर्वीचा पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणजे हातात काठी, बारा बोअरची बंदूक आणि अधिकाऱ्यांच्या कमरेला लटकवलेली पिस्तूल पहावयास मिळवत होती. सध्या पोलिस दलात १२ बोअर बंदूकपासून एसएलआर, कार्बाईन, पिस्टल, एस. एस. गन, पायलट गन, ग्लॉब १७, ग्लॉब १९, स्मिथ ॲण्ड वेसन, एम ॲन्ड पी, एकेएम, क्‍लॉट एम ४, ए १ सह ए. के. १०३ अशा अत्याधुनिक शस्त्रे दाखल आहेत. कायदा सुव्यवस्थेबाबतची परिस्थिती हाताळण्यासाठी या शस्त्रांचा परिणामकारक उपयोग होतो. ही अत्याधुनिक शस्त्रे कशा पद्धतीने हाताळायची, देखभाल याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. खंडेनवमी दिवशी या शस्त्रांचे पूजनही केले जाते.

Web Title: kolhapur news The Importance of Historical Weapons