स्वेच्छानिवृत्तीनंतर केली पीएच.डी.

संभाजी गंडमाळे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

शिकायच्या वयात काही जबाबदाऱ्या आपसूकच पडतात आणि जे शिकायचं ठरवलं असतं, ते राहूनच जातं. पण, स्वतः ठरवून काही गोष्टी करायच्या म्हटलं तर वयाचं कुठलंही बंधन आड येत नाही... ही सकारात्मक ऊर्जा साऱ्यांच्यात पेरणाऱ्या आधुनिक दुर्गांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. रंजन कुलकर्णी यांच्याविषयी...

शिकायच्या वयात काही जबाबदाऱ्या आपसूकच पडतात आणि जे शिकायचं ठरवलं असतं, ते राहूनच जातं. पण, स्वतः ठरवून काही गोष्टी करायच्या म्हटलं तर वयाचं कुठलंही बंधन आड येत नाही... ही सकारात्मक ऊर्जा साऱ्यांच्यात पेरणाऱ्या आधुनिक दुर्गांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. रंजन कुलकर्णी यांच्याविषयी...

वयाच्या अठराव्या वर्षी पदवीचे शिक्षण घेत असतानाच टपाल कार्यालयात नोकरी लागली. शिक्षण थांबलं. पुढे संसार सुरू झाला. मुलं झाली. त्यांची शिक्षणं सुरू झाली... जे सामान्य गृहिणीच्या वाट्याला येतं, ते सारं माझ्याही वाट्याला आलं. संसार आणि नोकरी करताना थोडीशी तारेवरची कसरत होतीच. पण, हे सारं आनंदानं स्वीकारलं. नाटकाची आवड पहिल्यापासून. त्यामुळं ते वेड मात्र नोकरी करतानाही जोपासलं. मात्र, शास्त्रीय संगीतात मला पीएच.डी. मिळवायची होती. ती अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी मात्र टपाल कार्यालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ती पूर्णही केली. डॉ. रंजन प्रमोद कुलकर्णी ‘सकाळ’शी संवाद साधत होत्या आणि ‘महिलांनो, शिकायला कुठल्याही वयाचं बंधन नसतं...’ असाच दुर्गामंत्र साऱ्यांना देत होत्या. 

वडगावच्या टपाल कार्यालयातून पोस्टमास्तर म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर शास्त्रीय संगीतात पीएच.डी. मिळविली असली, तरी आपले ॲकॅडमीक शिक्षण अपूर्ण राहिले, ही मनातील सल त्यांना गप्प बसू देत नव्हती. आम्हाला आमच्यासाठी ‘स्पेस’च मिळत नाही, ही मानसिकताच मुळात चुकीची आहे. ‘आवड असली की सवड नक्‍की मिळते.’ आजवरच्या सांगीतिक प्रवासात डॉ. अंजली निगवेकर, डॉ. भारती वैशंपायन, डॉ. विकास कशाळकर, बबनराव हळदणकर, रघुनंदन पणशीकर, स्मिता व उपेंद्र कारखानीस आदींनी सहकार्य केले.     

थोरला मुलगा बारावी उत्तीर्ण झाला आणि मग मी राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. नोकरी करीत असतानाच शिवाजी विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि गांधर्व महाविद्यालयाच्या संगीतातील विविध परीक्षाही दिल्या
- डॉ. रंजन कुलकर्णी