एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो म्हणून 34 लाखाने गंडविले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

डॉ. सुनंदा आळंगेकर यांची मुलगी श्रद्धा हिला एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता. अहमदनगर येथील प्रवरा नगर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे आरोपींनी सांगितले.

सोलापूर - एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो म्हणून 34 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत. 

विश्‍वास शाईवाले, सौरभ कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, डॉ. लोहारेकर, टाकळकर, शरणशेट्टी अशी आरोपींची नावे आहेत. डॉ. सुनंदा विक्रम आळंगेकर (वय 50 रा. पतंगे बिल्डिंग, अजय नगर, उमरगा जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. शाईवाले हा एमआर आहे तसेच त्याचा मंडप डेकोरटरचा व्यवसायही आहे. डॉ. सुनंदा आळंगेकर यांची मुलगी श्रद्धा हिला एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता. अहमदनगर येथील प्रवरा नगर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे आरोपींनी सांगितले. त्यानंतर कर्नाटकातील कॉलेजचा पर्याय ठेवण्याबाबत सांगितले. कर्नाटक एक्‍झामिशन ऍथॉरिटी बंगलोर येथे रजिस्टेशन करून घेतले. डॉ. आळंगेकर व त्यांची मुलगी श्रद्धा हिला बंगलोर येथे बोलावून घेतले. टाकळकर आणि शरणशेट्टी यांच्या सेमीनारला हजर ठेवले. त्यांच्याकडून प्रवेश मिळाले असे खोटे आश्‍वासन दिले. तसेच एमआरएमसी गुलबर्गा येथे मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. विश्‍वास शाईवाले याने श्रद्धा हिला एमआरएमसी कमिटीसमोर नेले. कमिटीसमोर श्रद्धाला खोटे कथन करायला लावले. आरोपींनी आपापसांत कट रचून डॉ. आळंगेकर यांचे विश्‍वास संपादन केले. प्रवेश मिळवून देतो म्हणून 34 लाख पन्नास हजार रुपये घेतले. पैसे घेतले पण प्रवेश मिळवून दिला नाही, मॅनेजमेंट कमिटीला पैसे दिले नाही. घेतलेले पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात डॉ. आळंगेकर यांच्यासह इतर पाचजणांची फसवणूक झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 34 lakhs 50 thousand cheating for MBBS admission in Solapur