सात हजार मोजण्या प्रलंबित

Counting-Pending
Counting-Pending

कोरेगाव - भूमिअभिलेख विभागातील सातारा सिटी सर्व्हे, कोरेगाव, दहिवडी व पाटण या चार कार्यालयांतील उपअधीक्षक हे मुख्य पद रिक्त असल्यामुळे त्या- त्या विभागातील शेतकरी वर्गासह नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. त्यात प्रामख्याने शेतीची मोजणी, हद्द कायम करणे, नकाशे, नकला काढणे आदी कामे वेळेत होत नसल्यामुळे वादावादीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यामध्ये एप्रिल २०१८ अखेर तब्बल सात हजार ४२ मोजणीची प्रकरणे प्रलंबित असल्याचे त्याचेच द्योतक आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

शासनपातळीवर शहर, गावपातळीवर महसूल, पोलिस, त्याखालोखाल भूमिअभिलेख अर्थात मोजणी कार्यालय हे महत्त्वाचे असते. शेती, घर, बंगला, प्लॉट आदी बाबींमध्ये मोजणी कार्यालय महत्त्वाचे असते. मात्र, गेल्या काही वर्षांत मोजणी कार्यालयांत शेतकरी वर्गासह सर्वांची पिळवणूक होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. साधी, तातडीची शुल्क भरूनही 
मोजणी वेळेत न मिळणे ही समस्या प्रामुख्याने समोर येते. त्यात सर्वसामान्य शेतकरी वर्गाची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येते.

त्याउलट बिल्डर, लॅंड डेव्हलपर, एजंट, राजकारणी, मोठे अधिकारी, सधन शेतकरी वर्गाला मात्र येथे चांगली वागणूक मिळते. त्यांच्या कामांचा निपटारा मात्र रात्ररात्र बसून केला जातो. त्यामागे आर्थिक हितसंबंध असे उघडपणे बोलले जाते.

अशी एक बाजू असली तरी दुसऱ्या बाजूने या कार्यालयांत आज अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेही या कार्यालयांत कामे होताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जिल्ह्यात काही तालुक्‍यांची ‘तालुका भूमिअभिलेख उपअधीक्षक’ ही पदे कित्येक वर्षे रिक्त असून, त्या-त्या ठिकाणी इतर तालुक्‍यांच्या उपअधीक्षकांकडे पदभार दिल्याचे दिसून येत आहे. परिणामी दोन्हीही तालुक्‍यांत कामांचा खोळंबा होतो, हे नाकारून चालणार नाही. 

आज सातारा सिटी सर्व्हेचे भूमिअभिलेख उपअधीक्षक हे पद रिक्त असून, त्याचा अतिरिक्त कार्यभार उपअधीक्षक सातारा, कोरेगावचेही पद रिक्त असून, त्याचा अतिरिक्त कार्यभार उपअधीक्षक वाई, दहिवडीचेही पद रिक्त असून, त्याचा अतिरिक्त कार्यभार उपअधीक्षक खंडाळा, तर पाटणचेही पद रिक्त असून, त्याचा अतिरिक्त कार्यभार उपअधीक्षक गावठाण सातारा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार सातारा शहर वगळता इतरत्र दोन पदांचा कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना सुमारे ७० ते ८० किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यामध्ये ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था सर्वच अधिकाऱ्यांसह नागरिकांची होताना दिसत आहे. या मुख्य अधिकाऱ्यांसह सर्वच कार्यालयांत भूकरमापक, नक्कल देणारा प्रतिलिपी लिपिक, छाननी लिपिक, निमतानदार आदी महत्त्वाची पदेही रिक्त असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे व शेतकरी, नागरिकांचे समाधान करणे अधिकारी वर्गाच्या नाकीनऊ आलेले आहे. मोजणीच्या बाबतीत नैसर्गिक स्थितीही बऱ्याच वेळा आडवी येताना दिसते. जेव्हा मोजणी शेतावर पोचते, त्यावेळी तेथे उसासारखे पीक असणे, हा मोठा अडथळा ठरतो. मोजणी करणारांना रिकाम्या हाताने परतावे लागते. पुन्हा मोजणीची तारीख मिळेपर्यंत मग शेतकरी वर्गाला घाई झाल्याचे निदर्शनास येते. त्यामध्ये कार्यालयाचा काहीच दोष नसतो. मात्र, त्याचे खापर आपोआप कार्यालयावर फुटत असते, असे अनुभवही येताना दिसतात.

 भूमिअभिलेख विभागात महत्त्वाची असलेली वर्ग दोनसह इतर काही पदे भरण्यासंर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. शासनस्तरावरून मेअखेर त्यातील बऱ्यापैकी पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. तोवर अतिरिक्त कार्यभाराद्वारे जनतेची कामे करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू आहे.’
- सुदाम जाधव, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, सातारा    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com