सातारा जिल्ह्यात ७७२ ‘आपलं सरकार’ केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

शासकीय सुविधा एकाच ठिकाणी; १९ प्रकारचे मिळणार दाखले

सातारा - डिसेंबरपासून जिल्ह्यातील संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) केंद्रे बंद केल्याने ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ ऑनलाइन सेवा देण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीमध्ये ‘आपलं सरकार’ सेवा केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यातील एक हजार ४९५ ग्रामपंचायतींपैकी ७७२ ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे सुरू झालीही आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९३ केंद्रे ही कऱ्हाड तालुक्‍यात आहेत. या केंद्रांतून ग्रामस्थांना १९ प्रकारचे दाखले उपलब्ध होत आहेत. 

ग्रामीण भागातील जनतेला आवश्‍यक शासकीय सुविधा एकाच ठिकाणी देण्याच्या दृष्टीने ‘आपलं सरकार’ या केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. या केंद्रांवर काम करणाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना नुकतेच जिल्हा परिषदेत प्रशिक्षण देण्यात आले. राज्य सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) केंद्रे सुरू केली होती. मात्र, डिसेंबरपासून ही केंद्रे बंद करण्यात आली. त्याऐवजी शासनाने नव्याने आपलं सरकार सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न १५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायत क्षेत्रात किमान एक स्वतंत्र केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न १५ लाखांपेक्षा कमी आहे, अशा दोन किंवा तीन ग्रामपंचायतीचे मिळून एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये पीओएस मशिन देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना विविध व्यवहार कॅशलेस करता येतील. 

लोकोपयोगी इतरही सेवा
‘आपलं सरकार’ सेवा केंद्रांतून ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे संगणकीकरण करण्यासोबतच ग्रामपंचायतीद्वारे देण्यात येणारे १९ दाखले हे संगणकीकृत दिले जातील. त्याशिवाय ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या परंतु, लोकोपयोगी असलेल्या इतर सेवाही दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये रेल्वे, बस आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅंकिंग सेवा, आर्थिक समावेशन, ई- कॉमर्स, पॅनकार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ता भरणे, पासपोर्ट, वीज बिल, टपाल विभागाच्या सेवाही उपलब्ध होत आहेत. 

...या मिळतात १९ सेवा
जन्मनोंदणी व प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र, रहिवासचा दाखला व प्रमाणपत्र, विवाहाचा दाखला, नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र, ना देय प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, विजेच्या जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय दाखला, जॉब कार्ड, बांधकामासाठी अनुमती, नळजोडणीसाठी अनुमती, चारित्र्याचा दाखला, निराधार योजनेसाठी वयाचा दाखला, दारिद्य्ररेषेखालील प्रमाणपत्र, हयातीचा दाखला.

जिल्ह्यातील तालुकानिहाय केंद्रे 
सातारा : ६५, खटाव : ४०, फलटण : ४९, पाटण : ३३, कोरेगाव : ४८, खंडाळा : ३१, जावळी : २१, महाबळेश्‍वर : १२, माण : ५२,  वाई : २५, कऱ्हाड : ९३.