‘माणदेश’च्या खिलारला गतवैभवाची आस...

नागेश गायकवाड
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

जिव्हाळा जपला जाईल - बंदी उठल्यामुळे बैलगाडी शर्यतींचाही मार्ग मोकळा

आटपाडी - बंदी उठल्यामुळे ग्रामीण भागात जिव्हाळ्याच्या बैलांच्या शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. शर्यतींत माणदेशी खिलार बैलांचाच दबदबा होता. बंदीमुळे व्यवस्थाच कोलमडून पडली होती. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता बंदी उठवल्यामुळे नव्याने खिलार बैलांच्या जोपासनेला गतवैभव प्राप्त होणार आहे. 

जिव्हाळा जपला जाईल - बंदी उठल्यामुळे बैलगाडी शर्यतींचाही मार्ग मोकळा

आटपाडी - बंदी उठल्यामुळे ग्रामीण भागात जिव्हाळ्याच्या बैलांच्या शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. शर्यतींत माणदेशी खिलार बैलांचाच दबदबा होता. बंदीमुळे व्यवस्थाच कोलमडून पडली होती. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता बंदी उठवल्यामुळे नव्याने खिलार बैलांच्या जोपासनेला गतवैभव प्राप्त होणार आहे. 

यांत्रिकीकरणाअगोदर बहुतांश शेती जनावरांच्या माध्यमातून कसली जात होती. त्यात खिलार वळू, खोंड आणि बैलाचे खूप महत्त्व होते. प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी ठरलेली असे. ट्रॅक्‍टर आला आणि बैलाच्या कामाचे महत्त्व कमी झाले. तरीही जातीवंत शेतकरी आजही बैलांकडूनच मशागतीसह अनेक महत्त्वाची कामे करून घेतात.

शेतीसाठी बैलजोडी संभाळताना शेतकऱ्यांना जातीवंत खिलार वळू, खोंड आणि बैल जोपासण्याचा छंद लागला. खर्चही तसाच करावा लागे. तरीही तो जोपासला गेला. एक प्रकारे ती ग्रामीण संस्कृतीच बनली होती. गावो-गावी जत्रा, इतर वेळी किमान वर्षातून एखादा तरी शर्यती ठरलेल्या. त्या पाहण्यास अनेक गावांतून शेतकरी येत. तो एक उत्सवच असे. त्यातून जातीवंत बैलांची  जोपासना वाढली. या छंद आणि खेळाचा प्रचार, प्रसार होत गेला. शर्यतीच्या बैलांना मागणी वाढत गेली.  १९९० च्या दशकात बैलगाडी शर्यतींची धूम होती. पळणाऱ्या बैलांसाठी वाटेल ती किंमत मोजण्याची शेतकऱ्यांची तयारी असे.

बैलाची निर्मिती जोपासलेल्या वळूपासून केली जाई. त्यांचा जिवापाड सांभाळले जाई. थोडा सराव करून घेतल्यावर खोंड शर्यतीसाठी बाहेर काढला जाई. त्यांच्या किमती लाखापासून दोन- तीन ते पाच लाखांपर्यंत गेल्या. त्यातही आटपाडी, पंढरपुरी (माणदेशी) बैलाला मागणी असे. राज्यभर होणाऱ्या शर्यती माणदेशाचे बैल गाजवत.

राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटकातून बैलांना मागणी होती. तो काळ खिलार जातीच्या वैभवाचा. शर्यतीवर बंदी घातल्यामुळे थेट त्यांच्यावर संक्रात आली. बरेच दिवस बंदी कायम राहिली. शर्यती बंद झाल्या. आता पुन्हा माणदेशच्या खिलार बैलांला गतवैभव मिळण्याची आशा आहे.

जातीवंत वळू, खोंड, बैल सांभाळण्याचा ५० वर्षांपासूनचा छंद आज कायम आहे. शर्यतींवरील बंदीमुळे खरेदी-विक्रीवर परिणाम झाला. त्यामुळे चांगले बैल दुर्मीळ झालेत. बंदी उठल्यामुळे खिलारला चांगले दिवस येतील.
- नारायण जाधव, शेतकरी.