मारेकऱ्यांबाबत ठोस धागेदोरे हाती - नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या तपासाबाबत यंत्रणेच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. येत्या काही दिवसांत ते समोर येतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात आज एसआयटी आणि तपास अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दीर्घकाळ बैठक झाली.

अपर पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा तपास अधिकारी म्हणून काम करीत आहेत. समीर गायकवाड याला यापूर्वी अटक केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केली. कोल्हापुरातील साक्षीदाराच्या जबाबानुसार तावडेचे कोल्हापूर कनेक्‍शन पुढे आले. डॉ. दाभोलकर, ॲड. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी हत्येत साधर्म्य असल्याचा संशय यंत्रणेला आहे. त्याच दृष्टीने तपास करण्यासाठी डॉ. तावडेला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास न्यायालयाने मंजुरीही दिली आहे. महिन्याहून अधिक काळ लोटला तरी अद्याप त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली झालेल्या नाहीत.

एसआयटीचे प्रमुख संजयकुमार दोन आठवड्यांपूर्वी पथकासह कोल्हापुरात आले होते. त्या वेळी त्यांनी तपास अधिकाऱ्यांसह विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली होती. त्यानंतर पानसरे कुटुंबीयांचीही भेट घेतली होती.

व्हीसीद्वारे आढावा

विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात आज दीर्घकाळ एसआयटी आणि तपास यंत्रणेची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. यात पुढील तपासाचीही दिशा ठरविली. लवकरच तपासाबाबत नवी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्‍यता एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.