निकृष्ट कामाला प्रशासन, वनविभागाचे पाठबळ 

निकृष्ट कामाला प्रशासन, वनविभागाचे पाठबळ 

कोल्हापूर - मौजे कुंभोज (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथे जलयुक्त शिवारमधून चुकीची आणि निष्कृष्ट कामे करून गैरव्यवहार उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे व तत्कालीन करवीर वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर यांनी शासनाचे नुकसान केले आहे. याची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीनेही तत्कालीन उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे व करवीर वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर यांच्यावर ताशेरे ओढून जलयुक्तची कामे निकृष्ट झाल्याचे अहवालात नमूद केले आहे, तरीही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, तत्कालीन मुख्य वनसंरक्षक श्री. राव यांनी या अधिकाऱ्यांवरील कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, सध्या विद्यमान मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांच्याकडे कारवाईची जबाबदारी आली आहे. 

चौकशी समितीत श्री. देशमुख हे अध्यक्ष, तर इचलकरंजीच्या तत्कालीन प्रांत अश्‍विनी जिरंगे, वनविभागाचे उपसंचालक तानाजी पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाअधिकारी दुर्गाली गायकवाड व हातकणंगले तालुका कृषी अधिकारी विश्‍वजित देवकर यांनी कुंभोज व तमदलगेतील जलयुक्त शिवारमधून झालेल्या कामाची तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांना तो अहवाल दिला होता. याशिवाय, नाईकडे यांना कारणे दाखवा नोटीसही दिली होती. यामध्ये उपवन संरक्षकांना 1 कोटीपर्यंतची कामे तांत्रिक मंजुरीचे अधिकार दिले आहेत, मात्र या अधिकाराचा तांत्रिक मंजुरी देताना वापर केलेला नाही. जलसंपदा विभागाच्या प्रादेशिक दरसूचीप्रमाणे कामे करण्याबाबत दिलेल्या सूचनांची दरसूची वापरलेली दिसत नाही. मौजे कुंभोज (क.न.706) मध्ये 6 व 5 शुष्क दगडी बंधारे बांधण्यासाठी मंजुरी घेतली होती. प्रत्यक्षात मात्र 7 बंधारे बांधलेले आहेत. डिसेंबर 2016 अखेर हे बंधारे बांधण्याच्या सूचना दिल्या होत्या. अद्याप यात काही बदल झालेल्याचे दिसून येत नाही. तसेच याच ठिकाणी (क.न.706) 4 ठिकाणी सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम केल्याचे दिसून येते. सिमेंट बंधारे बांधण्यासाठी जागेवर सर्व्हे करून स्थळ निश्‍चित करणे गरजेचे असताना हा सर्व्हे दिसून येत नाही. सिमेंट बंधारे बांधण्यासाठी साईड वॉल, विंग वॉल, की वॉल व पाणऊशीची कामे करणे अंदाजपत्रकात दिसून येत नाहीत. त्यामुळे कोणता आकृतीबंध वापरला व या उपचाराचा काय फायदा याचा उद्देश समजून येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून चौकशी समितीने तत्कालीन उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे व तत्कालीन करवीर वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर यांच्यावर ताशेर ओढले आहेत. 

खुलासा नाहीच 
अहवालानुसार शासनाच्या महत्त्वकांक्षी असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अनास्था दाखविली आहे. नाईकडे यांनी कामामध्ये कर्तव्य तत्परता ठेवलेली नाही. कामाबत हलगर्जीपणा केला आहे. यातून शासनाचे नुकसान झालेले असल्याचेही नमूद करून जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल पाठविला होता. तसेच याबाबतच खुलासाही मागितला होता, मात्र अद्यापही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com