परवान्यानंतर विमानाचे टेक ऑफ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कोल्हापूर - कोल्हापूरच्या विमानतळाचा परवाना यापूर्वीच मुदतबाह्य झाला आहे, तो मिळाल्यानंतरच कोल्हापुरात नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या विमानतळाच्या सरंक्षक भिंतीच्या कामाला निधी मंजूर झाला असून, उर्वरित विकासासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. 

कोल्हापूर - कोल्हापूरच्या विमानतळाचा परवाना यापूर्वीच मुदतबाह्य झाला आहे, तो मिळाल्यानंतरच कोल्हापुरात नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या विमानतळाच्या सरंक्षक भिंतीच्या कामाला निधी मंजूर झाला असून, उर्वरित विकासासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. 

देशातील "टॉप वन' खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल श्री. महाडिक यांनी आज "सकाळ'च्या कार्यालयाला भेट दिली. कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. महाडिक यांनी विकासाच्या अनेक मुद्द्यांबाबत चर्चा केली. 

ते म्हणाले, ""विमानतळाचा परवाना 2011 ला संपला आहे. परवाना परत मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. उद्योगपती संजय घोडावत यांच्यासह काही कंपन्यांनी छोटी विमाने सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरची विमानसेवा अधिक फायदेशीर आहे, त्यामुळेच ती लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.'' 

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलासाठी कायद्यात बदल करावा लागणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्‍यक आहे. दोन महिन्यांत मंत्रिमंडळाची बैठकच निवडणुकांमुळे झालेली नाही. आता ज्यादिवशी ही बैठक होईल, त्यादिवशी त्याला मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर लगेच पर्यायी पुलाचे रखडलेले काम सुरू होईल, असेही श्री. महाडिक यांनी या वेळी सांगितले. 

कोल्हापूर रेल्वेने कोकणला जोडण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होती. गेल्या तीन वर्षांच्या खासदारकीच्या काळात यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या मार्गाला अलीकडेच मंजुरी मिळाली आहे. सुरवातीला केवळ एक लाखाची तरतूद या प्रकल्पासाठी झाली होती, आता तब्बल 270 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. किमान साडेतीन हजार कोटींची यात गुंतवणूक अपेक्षित असून, यापैकी दीड-दोन हजार कोटी हे कोल्हापूरसाठी मिळतील, असा विश्‍वासही श्री. महाडिक यांनी व्यक्त केला. 
या वेळी समीर शेठ, मिलिंद धोंड, संग्राम निकम, छोटू लोहार उपस्थित होते. 

Web Title: After the take-off flight