वीज दरवाढविरोधी आंदोलन सुरू राहील - डॉ. एन. डी. पाटील

वीज दरवाढविरोधी आंदोलन सुरू राहील - डॉ. एन. डी. पाटील

कोल्हापूर - ‘जनतेची मते विचारात न घेता, काँग्रेस आघाडी सरकारच्या तुलनेत सध्याच्या सरकारने अवाच्या सव्वा वीज दरवाढ केली आहे. अशा दरवाढीला शेतकऱ्यांचा थेट विरोध आहे. तो आम्ही नियामक आयोगासमोर मांडला आहे. येत्या काही दिवसांत वीज दरवाढ रद्द करण्यासंदर्भात अपेक्षित निर्णय न झाल्यास शेतकरी आंदोलन सुरू ठेवतील,’  अशी माहिती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे मागितलेली दरवाढ, त्याला असलेला शेतकऱ्यांचा विरोध या पार्श्‍वभूमीवर डॉ. पाटील यांची भूमिका जाणून घेतली असता, ते म्हणाले, ‘‘महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला. त्यात मोठी वाढ मागितली. म्हणून अशी वाढ मान्य नसल्याच्या हरकती शेतकऱ्यांनी वीज नियामक आयोगाकडे पाठविल्या आहेत. त्याबाबत सध्या विचारविनिमय सुरू आहे. त्यानंतर नियामक आयोगाचे सदस्य, तसेच महावितरणकडून वीज दरवाढीबाबत पुढे काय झाले याची तपशीलवार माहिती आम्हाला मिळेल. येत्या दोन- चार दिवसांत त्यांचा अंतिम निर्णय आमच्यापर्यंत येईल. त्यानंतर आमची भूमिका निश्‍चित करूच; पण वीज दरवाढीला मात्र आमचा विरोध कायम राहणार आहे.’’

वीज खरेदी करण्यापासून ते वीज वितरणापर्यंतचा महावितरणचा खर्च वाढत आहे. त्यामुळे वीज दरवाढ अपर्यायी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. याविषयी विचारले असता डॉ. पाटील म्हणाले,‘‘वीज कंपनीकडून अजूनही विजेची काटकसर केली जात नाही, विजेची गळती थांबविण्यात अपयश येत आहे. वीजचोरी थांबवली पाहिजे, बाहेरून जी वीजखरेदी करावी लागते, ती स्पर्धात्मक दराने खरेदी करावी लागेल; मात्र तसे न करता त्यांच्या पसंतीने महाग दरात वीजखरेदी केली तर त्यातून नुकसान वाट्याला येते. त्यामुळे वीजखरेदी करताना तारतम्य बाळगणे अपेक्षित आहे.’’

तारतम्य सुटणे, कारभार सदोष असल्यामुळे नुकसान होत असेल आणि ते भरून काढण्यासाठी शेतीपंप वीजग्राहकांवर बिलाचा भार टाकवा लागत असेल तर ते चुकीचे आहे, असे डॉ. पाटील म्हणाले. 

शेतकरी जसे नाराज आहेत, तसे उद्योजकही नाराज आहेत. विजेची थेट दरवाढही शेतकऱ्यांसह अन्य घटकांनाही संकटात टाकणारी आहे. त्यामुळे या दरवाढीला विरोध होत आहे. हा विरोध जाणून न घेता थेट वीजदरवाढ लादली गेल्यास आंदोलन अपरिहार्य आहे. यापूर्वी शेतीपंपाच्या वीज दरवाढीला विरोध करण्यासाठी तीव्र आंदोलने झाली. भविष्यात त्याच धर्तीवर आंदोलने होतील.
- प्रा. डॉ. एन. डी. पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com