अजिंक्‍यताऱ्यावर राजरोस वृक्षतोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

सातारा - मराठ्यांची, सातारकरांची अस्मिता असलेल्या अजिंक्‍यतारा किल्ल्याची तटबंदी मेटाकुटीस आली असताना आता वृक्षतोडीचे ग्रहण लागले आहे. शाहूनगर, गोळीबार मैदानाकडील बाजूने सातत्याने वृक्षांची कत्तल केली जात असतानाही त्याकडे वन विभाग व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे. एकीकडे किल्ल्यावर श्रमदान करून वृक्ष जोपासताना शेकडो हात घाम गाळत आहेत, तर दुसरीकडे अज्ञातांकडून ही वृक्षतोड सुरू आहे. 

मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेल्या अजिंक्‍यतारा किल्ल्याला आता दुर्लक्ष अन्‌ उदासिनतेचे ग्रहण लागले आहे. जाज्वल्य इतिहास असलेल्या या किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासन, लोकप्रतिनिधी ठोस पावले उचलत नाहीत. त्याचा दुष्परिणाम म्हणून किल्ल्याच्या तटबंदी ढासळू लागल्या आहेत, तर किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेवा नष्ट होऊ लागला आहे.

अजिंक्‍यताराप्रेमींनी किल्ल्याच्या संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले आहेत. वृक्षारोपण करून रोपे जगविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टाही करण्यात येत आहे. त्याचे आता दृष्य परिणामही दिसून येत आहेत. किल्ल्यावर हिरवळ पसरली असून, रोपेही चांगली जगली आहेत. 

दुसरीकडे मात्र अज्ञात लोक दररोज राजरोसपणे वृक्षांची तोड करत आहेत. मंगळाईदेवीच्या मंदिरापासून दक्षिण दरवाजाकडे जाणारी पायवाट असून, त्या बाजूने काहीजण शेळ्या चारण्यास नेत असतात. याच शाहूनगर, गोळीबार मैदानाकडील बाजूने झाडे तोडून त्याचा पाला शेळ्यांना दिला जात आहे. त्यानंतर वाळलेल्या झाडांची चोरी केली जात आहे. याकडे वन विभाग, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन मोठमोठ्या झाडांची तोडणी सुरू झालेली आहे. 

अजिंक्‍यतारा किल्ल्यावरील वृक्षांचे संवर्धन झाले पाहिजे. मात्र, अज्ञातांकडून दररोज वृक्षतोड होत असून, त्यावर प्रशासनाने लक्ष ठेवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.
- संदीप मांढरे, सातारा

Web Title: ajinkyatara fort tree cutting