बेकायदा गर्भपात प्रकरणी तपास यंत्रणेच्या भूमिकेवर संशय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

अकलूज  - लिंगनिदान व गर्भपात प्रकरणी येथील डॉ. तेजस व डॉ. प्रिया गांधी या दांपत्याला अटक झाल्यावर या प्रकरणातील मोठे रॅकेट उघड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तसे नसल्याने पोलिस तपासाबाबत अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी सातारा येथील दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना होत आहे.

डॉ. गांधींच्या सिया हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात केले जात असल्याचे प्रकरण 25 ऑगस्टला उघड झाले. सातारा जिल्ह्यातील अशाच प्रकरणाचे धागेदोरे अकलूजशी निगडीत आहेत. डॉ. गांधीकडे 14 महिन्यांत 36 बेकायदा गर्भपात केल्याच्या नोंदी सापडल्या.

तथापि, अद्याप कारवाई न झाल्याने तपास यंत्रणांनी या प्रकरणातील मंडळींना अर्थपूर्ण अभय दिल्याची चर्चा सुरू आहे. येथे गर्भपात करून घेणाऱ्यांत काही शासकीय कर्मचारी तर काही राजकीय क्षेत्रातील मंडळी असल्याचे सांगितले जात आहे. तिसऱ्या अपत्यानंतर नोकरीत येणाऱ्या अडचणी किंवा ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहण्यासाठी काहींनी गर्भपात करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी सातारा येथून उद्या दोघांना ताब्यात घेतले जाणार आहे. त्यासाठी येथील पोलिसांचे पथक रवाना होत आहे.
- अरुण सावंत, पोलिस निरीक्षक, अकलूज पोलिस ठाणे