रिक्षा, व्हॅन, बस कृती समितीचा आज मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

सांगली - मोटार वाहन कायद्यातील तरतुदीमधील वाहनाच्या विविध शुल्कांमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ रिक्षा, व्हॅन आणि बस कृती समितीच्यावतीने मंगळवारी (ता. 24) खासगी प्रवासी वाहने बंद ठेवून "आरटीओ' कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर बंद पाळल्यामुळे विद्यार्थी वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

शासनाने परवाना नूतनीकरण, फेर तपासणी, योग्यता प्रमाणपत्र, बोजा नोंदवणे, नवीन रिक्षा नोंदणी, लायसन्स नूतनीकरण आदी शुल्कात दुप्पट ते पंधरापटीने वाढ केली आहे. यापूर्वीच विमा हप्त्यात वाढ केल्यामुळे रिक्षा, व्हॅन, बसचालक मेटाकुटीला आले आहेत. तशातच शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे या व्यवसायाला "ब्रेक' लागला आहे. शासनाने शुल्कवाढ मागे घ्यावी तसेच स्पीड गव्हर्नरची अट रद्द करावी, व्यवसाय कर व पर्यावरण कर रद्द करावा यासाठी कृती समितीने दोन आठवड्यापासून विविध आंदोलने सुरू केली आहे. निदर्शने, धरणे, काळे झेंडे लावून निषेध यानंतर मंगळवारी रिक्षा, व्हॅन, टॅक्‍सी, खासगी बसेस बंद ठेवून सकाळी 11 भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 

डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून रिक्षा, व्हॅन, टॅक्‍सी, प्रवासी बसेससह मोर्चास सुरवात होईल. कृती समितीचे नेते पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चा आरटीओ कार्यालयासमोर आल्यानंतर निवेदन दिले जाणार आहे. आरटीओंना निवेदन दिल्यानंतर समितीच्यावतीने पुढील आंदोलनाची दिशा निश्‍चित केली जाणार आहे. 

दरम्यान, मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी प्रवासी वाहने बंद राहणार आहेत. विद्यार्थी वाहतूक देखील बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी आंदोलनास पाठिंबा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन समितीच्यावतीने शंकर माळी, आनंद जमखंडीकर, राजू रसाळ, अविनाश शिंदे यांनी केले आहे. 

खासगी प्रवासी वाहने बंद
जिल्ह्यात ऑटो व ऍपे रिक्षा सुमारे 9 हजार आहेत. स्कूल बसेस, व्हॅन आणि टाटा मॅजिक अशी विद्यार्थी वाहतूक करणारी 500 वाहने आहेत. ही सर्व वाहने बंदमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे परवानाधारक खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्यांना पर्यायी वाहनाचा वापर करावा लागणार आहे.

Web Title: Autos, vans, buses action committee today rally