बांगलादेश मुक्ती लढ्याचे िवस्मरण

बलराज पवार
रविवार, 25 डिसेंबर 2016

युद्धाला ४५ वर्षे पूर्ण - डिसेंबरच्या ‘त्या’ युद्धात जिल्ह्यातील ४० जवान शहीद 

सांगली - बांगलादेश मुक्ती युद्धात जिल्ह्यातील सैनिकांनी शौर्य गाजवले होते. पाकिस्तानविरुद्ध सन १९७१ मध्ये झालेल्या या युद्धाला नुकतीच ४५ वर्षे पूर्ण झाली. अवघ्या १२ दिवसांत पाकिस्तानचा फडशा पाडताना तब्बल ९६ हजार पाकिस्तानी सैनिक भारतीय लष्करासमोर शरण आले होते. 

युद्धाला ४५ वर्षे पूर्ण - डिसेंबरच्या ‘त्या’ युद्धात जिल्ह्यातील ४० जवान शहीद 

सांगली - बांगलादेश मुक्ती युद्धात जिल्ह्यातील सैनिकांनी शौर्य गाजवले होते. पाकिस्तानविरुद्ध सन १९७१ मध्ये झालेल्या या युद्धाला नुकतीच ४५ वर्षे पूर्ण झाली. अवघ्या १२ दिवसांत पाकिस्तानचा फडशा पाडताना तब्बल ९६ हजार पाकिस्तानी सैनिक भारतीय लष्करासमोर शरण आले होते. 

जगाच्या इतिहासात दखल घेतल्या गेलेल्या या युद्धात शौर्य गाजवताना जिल्ह्यातील ४० सैनिक शहीद झाले होते. हा इतिहास १९७१च्या डिसेंबर महिन्यात घडला होता. देशात १९९९चा कारगिल विजय दिवस साजरा होत असताना पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवलेला १६ डिसेंबर १९७१चा विजय दिवस साजरा केला जात नाही. जिल्ह्यातील तब्बल ४० जवान शहीद होऊनही त्यांचे स्मरण केले जात नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६५ ला युद्ध झाले होते. त्यावेळीही पाकचा पराभव केला होता. मात्र १९७१ मध्ये झालेले युद्ध अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरले होते. यामध्ये पाकिस्तानची शकले करून भारताने बांगलादेशची निर्मिती केली. डिसेंबरमध्ये झालेले हे युद्ध केवळ १२ दिवस चालले. यात भारतीय फौजांनी अतुलनीय शौर्य गाजवून पाकिस्तानला शरणागती पत्करावयास भाग पाडले होते. १६ डिसेंबर रोजी ढाका येथे भारतीय फौजांच्या तडाख्यात ९६ हजार पाक सैनिक सापडले होते. त्यांनी शस्त्रे टाकून शरणागती पत्करली. जगाच्या इतिहासात एखाद्या युद्धात एवढ्या मोठ्या संख्येने सैनिकांनी शरणागती पत्करण्याची ही दुसरीच वेळ होती.

या युद्धात ३९०० भारतीय जवान शहीद झाले होते, तर ९८५१ सैनिक जखमी झाले होते. या युद्धात जिल्ह्यातील ४७ जवान शहीद झाले होते. यामध्ये जिल्ह्यातील दुष्काळी तालुके हे सैनिकांसाठीच प्रसिद्ध आहेत. तासगाव, जत, मिरज आणि कवठेमहांकाळ या तालुक्‍यांमधून आजही सैनिक भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे शहीद झालेल्यांमध्येही या तालुक्‍यातील सैनिकांचे प्रमाण जास्त दिसते.

आजवर १५७ जवान शहीद
सैन्य भरतीतून लष्करात दाखल झालेल्या सैनिकांमध्ये आजवर १५७ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये नौदल, सीमा सुरक्षा दल यातील शहिदांचा समावेश नाही. यातही पाकिस्तानविरुद्धच्या दोन युद्धांमध्ये तसेच चीनविरुद्ध झालेल्या १९६२च्या युद्धात एकूण ८६ जण शहीद झाले आहेत. त्यापूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४९ मध्ये जम्मू काश्‍मीरात झालेल्या मोहिमेत सोनी (ता. मिरज) येथील राजाराम साळुंखे शहीद झाले होते. ते सुभेदार पदावर होते. स्वातंत्र्यानंतर जिल्ह्यातील ते पहिलेच शहीद सैनिक ठरले, तर १९७१च्या पाकिस्तान युद्धानंतर प्रत्यक्ष युद्धात नसले तरी विविध मोहिमांमध्ये ७० सैनिक शहीद झाले आहेत.

भारत-पाक ६५च्या युद्धाचा सुवर्णमहोत्सव
भारताच्या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या १९६५च्या युद्धाला यंदा ५१ वर्षे पूर्ण झाली. त्या युद्धातही जिल्ह्यातील ३१ सैनिक शहीद झाले होते. मे ते सप्टेंबर ऑक्‍टोबरअखेर हे युद्ध सुरू होते. त्यानंतर १९७१ मध्ये झालेल्या युद्धात ४७ जवान शहीद झाले होते. यातही सतत सुरू असणाऱ्या चकमकीत सात जण, तर प्रत्यक्ष युद्धात ४० जण शहीद झाले.

शहिदांचा विसर
खरे तर १९७१च्या भारत-पाक युद्धातील विजयाबद्दल काही वर्ष १६ डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जात होता. मात्र तो कालांतराने कमी झाला. जिल्ह्यातील ४७ सैनिक १९७१च्या युद्धात शहीद झाले आहेत. त्यामुळे किमान १६ डिसेंबरला या सैनिकांच्या शौर्याचे स्मरण म्हणून विजय दिवस साजरा करण्याची गरज आहे.