आषाढी यात्रेसाठी बसस्थानकांना देणार रंगावरून ओळख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

सोलापूर - यंदाच्या आषाढी वारीत पंढरपुरातील भीमा, चंद्रभागा आणि विठ्ठल या तीनही बसस्थानकांना रंगांवरून ओळख मिळणार आहे. प्रचंड गर्दीत माहितीअभावी वारकऱ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी ही युक्ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने योजल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची एसटी गाड्या लवकर न मिळाल्यामुळे परतीच्या प्रवासात मोठी अडचण होते. आपल्या जिल्ह्यात, तालुक्‍यात जाणारी एसटी गाडी तीनपैकी कोणत्या बसस्थानकावर थांबली आहे याची माहिती वेळेत न मिळाल्यामुळे अनेकांच्या गाड्या चुकतात. हा गोंधळ टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी ही संकल्पना मांडली. भीमा बसस्थानकाला भगवा, चंद्रभागा बसस्थानकाला गुलाबी तर विठ्ठल बसस्थानकाला जांभळा रंग ठरवून देण्यात आला आहे. संबंधित बसस्थानकावर ज्या जिल्ह्यातील गाड्या थांबविण्यात येणार आहेत त्या बसस्थानकाच्या रंगाचे कार्ड तयार करावेत. संबंधित जिल्ह्याची गाडी या बसस्थानकावर थांबविण्यात येणार आहे, अशा आशयाचा मजकूर लिहिलेले कार्ड त्या गाडीतील वारकऱ्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसेच 16 दिंडी प्रमुखांनाही याबाबतची पत्रके देण्यात आली आहेत. 

शिवाय पंढरपुरातील तीन रस्ता भागात दोन तर अहिल्या चौकात एक प्रवासी मार्गदर्शन केंद्र 24 तास सुरू राहणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना प्रवासाबाबत कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. अहिल्या चौक ते विठ्ठल सहकारी साखर कारखाना या मार्गावर 10 रुपयांत शटल बससेवाही मिळणार आहे, असेही विभाग नियंत्रक श्री. जोशी यांनी सांगितले.