बेळगावमध्ये अटक केलेल्या तरुणाची सुटका करा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

त्या तरुणाची तातडीने सुटका व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावेत; अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशाऱ्याचे निवेदनही कार्यकर्त्यांनी गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांना दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व वसंत मुळीक यांनी केले. 

कोल्हापूर - "मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचा' असे मजकूर लिहिलेले टी-शर्ट विक्री केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या तरुणावर बेळगावात दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने नोंदवला. त्या तरुणाची तातडीने सुटका व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावेत; अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशाऱ्याचे निवेदनही कार्यकर्त्यांनी गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांना दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व वसंत मुळीक यांनी केले. 

मुळीक म्हणाले, ""बेळगाव येथे 16 फेब्रुवारीला मराठा क्रांती (मूक) मोर्चा होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. यात समस्त मराठा समाज उत्स्फूर्तपणे सहभागी झाला आहे. समाजबांधव झेंडे, पताका, टी-शर्ट, टोप्या खरेदी करत आहेत. मोर्चात सीमावासीयांच्या ज्वलंत प्रश्‍नांसह विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. याच कारणाने बेळगाव प्रशासनाकडून विविध अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मोर्चाला परवानगी देणे, त्यासाठी अटी-नियम लावणे, संयोजकांना नोटिसा बजावणे, तरुणांवर गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरू आहेत. काल बेळगावात कोल्हापूरचा तरुण शहाजीराजे दिलीप भोसले (वय 27, रा. वारणा-कोडोली) हा तरुण टी-शर्ट विक्री करत होता. मात्र टी - शर्टवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे कारण पुढे करत त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून बेळगाव प्रशासनाने अटक केली. हे कृत्य म्हणजे लोकशाहीस काळीमा फासणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. पोलिस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा. केंद्रीय गृह विभागाच्या माध्यमातून तातडीने त्या तरुणाची सुटका करावी; अन्यथा त्याच्या सुटकेसाठी राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल. 

गृह पोलिस उपअधीक्षक माने यांनी निवेदन स्वीकारून तातडीने याबाबत कार्यवाही करण्यासंबंधी गृह विभागाला कळवतो, असे आश्‍वासन कार्यकर्त्यांना दिले. यात कमलाकर जगदाळे, शंकरराव शेळके, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, महादेव पाटील, बाबूराव कदम, जयश्री पोवार, दिगंबर साळोखे, मानसिंग जाधव, विजय जाधव, आदित्य उलपे, महेश खामकर, लहू शिंदे, शुभम शिरहट्टी, केदार गायकवाड, मच्छिंद्र पाटील, माजी नगरसेवक उदय जगताप, श्रीधर गाडगीळ, संजय काटकर, रवींद्र कांबळे, केतन बावडेकर, ओंकार जगताप, संदीप माने, चंद्रकांत चव्हाण, अवधूत पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.